माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन…
“माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन, स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान.” असे अभिमानाने आपल्या काव्यप्रतिभेने अवघ्या मराठी जनांना सांगणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. आजचा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ मध्ये पुण्यात झाला. कवितेमध्ये रमतांना कुसुमाग्रजांनी कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्मयातही मुक्त विहार केला. वयाच्या १७ व्या वर्षापासून ‘बालबोधमेवा’ या मासिकातून कुसुमाग्रजांनी कविता आणि ललित साहित्य लिहायला सुरुवात केले.
१९४२ मध्ये प्रसिद्ध झालेला ‘विशाखा’ हा त्यांचा काव्य संग्रह साहित्यातला ठेवा आहे. कुसुमाग्रजांच्या क्रांतीचा जयजयकार, वेडात मराठे वीर दौडले सात, आगगाडी आणि जमीन, पृथ्वीचं प्रेमगीत या कविता आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. ‘नटसम्राट’ या महान नाट्यकृतीसाठी कुसुमाग्रजांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. तर १९८८ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज दुसरे मराठी साहित्यिक होते. एका अर्थाने कुसुमाग्रज सामाजिक चळवळीचे ते प्रणेते होते.त्यांचे मराठी भाषेतील अमुल्य योगदान आपण विसरूच शकत नाही.
पण तुम्हाला माहित आहे का आपली मराठी भाषा किती प्राचीन आहे? तर मराठी ही मूळ आर्यांची भाषा आहे. जवळजवळ १५०० वर्षांचा इतिहास जपणारी म्हणजेच मराठी भाषा होय. तिचा विस्तार पाहायला गेला तर सह्याद्री, सातपुडासारख्या डोंगररांगा, गड व किल्ले, दर्याखोर्यांचा परिसर म्हणजेच महाराष्ट्र भूमी. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेपर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत आपल्या मराठीचा विस्तार झाला आहे. प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात मराठी भाषा विकसित झाली.
आता मराठीच्या प्राचीनते बाबत बोलायचे तर, इ. सन ५००-७०० वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य ‘श्री चामुण्डेराये करविले’ असे श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले होते. ते शके ९०५ मधील आहे अशी माहिती समोर येते. विवेकसिंधु हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे जो शके १११० मध्ये मुकुंदराजांनी रचला होता. ज्ञानेश्र्वरांनी ‘परि अमृताही पैजा जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके मेळविन।’ अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले आहे.
भगवद्गीता सर्वसामान्यांना समजावी, यासाठी ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन मराठीत केले.तसेच मराठीच्या इतिहासातील ‘लीळाचरित्र’ म्हणजे मराठीतील पहिला मराठी पद्य चरित्रग्रंथ होय जो चक्रधर स्वामींनी लिहिला आहे हे आपण शाळेत असतांना पासून जाणतो. त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये म्हणजेच मराठीची गतिमानता, सहजसौंदर्य, नादमाधुर्य, गोडवा दिसून येतात. संत एकनाथांनी ‘भागवत’ ग्रंथाची रचना करून मराठीत भर घातली. यातील बोलीभाषेशी जवळीक साधणारा शब्दसंग्रह, छोटी छोटी लयबद्ध वाक्ये यामुळे १३ व्या शतकातील मराठी भाषा आजच्या वाचकालाही तितकीच आपलीशी वाटते.
बदलत्या काळानुसार मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठी भाषेच्या स्वरूपात अनेक बदल झालेले दिसतात. या बदलाचे एक मुख्य कारण म्हणजे मराठी मातीत राज्य केलेले निरनिराळ्या सत्ता होय. १२५० ते १३५० या काळातील यादवी सत्ता, १६०० ते १७०० या काळातील शिवाजी महाराजांची सत्ता, १७०० ते १८१८ पेशवाई सत्ता आणि १८१८ पासून इंग्रजांची सत्ता. यामुळे प्रत्येक काळात टप्याटप्याने मराठी भाषेवर याचे परिणाम दिसून येतात. काळाप्रमाणेच स्थलानुसार मराठी भाषा बदलत गेली. त्यातूनच मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वर्हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी असे पोट-प्रकार पडत गेले. सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पेशवाईच्या अस्ताबरोबरच इंग्रजांच्या सत्तेत मराठी भाषेची संरचना काही प्रमाणात बदलली. इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळे मराठीत सुद्धा निबंध, कादंबरी, लघुकथा, शोकात्मिका असे अनेक नवे साहित्य-प्रकार मराठीतून देखील लिहिले जाऊ लागले होते. परंतू त्याचदारम्यान आधुनिक काळातील महात्मा फुले यांचा ‘शेतकर्यांचा आसूड’ हा ग्रंथाने इंग्रजांच्या काळातील नवीन बदल दाखवून दिले होते.
वि. वा. शिरवाडकर, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी, कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, ना. सि. फडके यांसारख्या मोठं-मोठ्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मराठी मनामनांत जिवंत ठेवली.
काळाच्या ओघात मराठी भाषा बदलत आहे. मात्र या बदलात मराठीचे चुकिचे रुप येता कामा नये. मराठीवर जोरकसपणे इतर भाषांचे आक्रमण होत आहे. कुठल्याही भाषेला विरोध नाही परंतु मराठीचे ऐश्वर्य हरवता कामा नये. मराठी भाषा, तिच्यातील साहित्य, तिचा संपन्न इतिहास बघता मराठी ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आधिक प्रयत्नाची गरज आहे, त्यासाठी अधिक प्रयत्न करण्यासह मराठीचा वापर, दर्जा, शुद्धता टिकवणे हे प्रत्येक मराठी जणांचे आद्य कर्तव्य आहे यावर सर्व मान्यवर, साहित्यिक, मराठीप्रेमींचे एकमत दिसून येते.
आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी राजभाषा दिनानिम्मिताने, आपल्या सर्वांनाच शब्द दिला आहे कि, “पुढच्या मराठी भाषा दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे हे ध्येय प्रत्येक मराठी सुपुत्र व कन्येने बाळगले तर कोणाची हिंमत आहे हा दर्जा न देण्याची’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय समितीला लक्ष्य केले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम कोणी करायचे आणि कसे करायचे याचे उत्तर शोधण्याची गरज नाही. हे काम आपणच करायचे आहे. आता सर्वांनाच अशीच आशा लागली आहे कि पुढील वर्षांपर्यंत मराठी ला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळेल.