लस घेण्यापूर्वी रक्तदान करा! विजय वडेट्टीवार यांचं जनतेला आवाहन

मुंबई : मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती अजूनच बिकट आहे. त्यामुळे कोरोना विषाणूला हरवण्यासाठी व्यापक प्रमाणात लसीकरण होणं आवश्यक आहे. अशा स्थितीत १ मे पासून राज्यात १८ वर्षांवरील लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. पण यानंतर एक वेगळीच चिंता देशाला सतावत आहे. कोरोना लस घेतल्यानंतर पुढील ६० दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे दरम्यानच्या काळात राज्याला रक्त टंचाईचा सामना करावा लागू शकतो.
याचा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जनतेला रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. १ मे पासून राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्त्वपूर्ण टप्पा सुरू होणार आहे. १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वजणांना लस घेता येणार आहे. पण लस घेतल्यानंतर पुढील ६० दिवस आपणास रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात रक्त टंचाई टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करावं, असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
वडेट्टीवार पुढं असंही म्हणाले की, सध्या रुग्णालयांमध्ये कोविड आणि नॉन-कोविड अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांची आवश्यकता भासत आहे. अशातच कोरोना लस घेतल्यानंतर पुढील ६० दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे लस घेण्यापूर्वीच रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घ्या, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी २८ एप्रिल नंतर cowin.gov.in. या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मागील वर्षापासून देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून रक्तदान करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सामाजिक भान जपत रक्तदान करा. तुम्ही केलेल्या रक्तदानामुळे अनेक रुग्णांचा जीव वाचवला जाऊ शकतो, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे