पुण्यातील डॉक्टर व हॉस्पिटलेच ऑक्सिजनवर

पुणे : पुण्यात सद्यपरिस्थितीमध्ये कोविड- १९ आजाराचे व्यवस्थापन करताना ऑक्सीजन, रेमडेसिव्हर वितरणाच्या प्रशासकीय समस्या निर्माण झालेल्या आहेत , त्या तातडीने दूर कराव्यात अशी मागणी पुणे डॉक्टर्स असोसिएशनने पत्रकार परिषदेत केली.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संभाजी मांगडे म्हणाले, ‘पुण्यात अनेक कोविड उपचार केंद्रे सुरु झाली आहेत. प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण तपासत असताना व उपचार देत असताना हॉस्पिटल्स, कोविड केअर सेंटर्स तसेच वैद्यकिय सेवक यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ऑक्सिजनची कमतरता तसेच या आजारासाठी संजीवनी ठरत असलेल्या इंजेक्शन रेमडेसीविरची पुरेशी उपलब्धता नसणे, ही अडचण येत आहे. प्रशासनाच्या सहकार्याशिवाय सार्वजनिक आरोग्य सेवा संपूर्ण होऊ शकत नाही. या गोष्टी असतील तरच डॉक्टर्स कोविडच्या रुग्णांना बरे करु शकतात. असेही त्यांनी यावली सांगितले.
गेले १५ दिवस ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे, तसेच इंजेक्शन रेमडेसिवीर उपलब्ध होत नाहीत. या स्थितीत खाजगी रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये येणारे रुग्ण हे अत्यवस्थ स्थितीत येतात. त्यांना ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्यास नातेवाईक उपलब्ध बेडवरती रुग्णांना अॅडमिट करून घ्या म्हणतात. अशा रुग्णांना शेवटपर्यंत ऑक्सिजन बेड मिळत नाही व रुग्ण दगावतो. सर्व वैद्यकिय सेवकांची प्रशासनाला एकच विनंती आहे, आम्ही रुग्ण वाचविण्यासाठी स्वतःच्या जिवावर उदार होण्यास देखील तयार आहोत परंतु रुग्णांना सेवा पुरविण्यासाठी ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत त्यांची अडचण येणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावे असेही त्यांनी डॉ. संभाजी मांगडे यांनी सांगितले.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संभाजी मांगडे, विश्वस्त डॉ. सुनील जगताप, डॉ. रवींद्रकुमार काटकर, डॉ.नीरज जाधव हे उपस्थित होते.