राज्यात मोफत लसीकरणावरुन महाविकास आघाडीमध्ये मतभेद

राष्ट्रवादीच्या घोषणेनंतर कॉंग्रेसने घेतली ‘ही’ भूमिका
मुंबई : देशात व राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. दरम्यान राज्याची परिस्थिती तर चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य सेवा व सुविधा आता अपुऱ्या पडू लागल्या आहेत. रुग्णालयात बेड्स मिळेनासे झाले आहे, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे, कोरोनासाठी लागणाऱ्या औषधांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो आहे. अशा परिस्थितीत प्रशासकीय यत्रंणा आपली जबाबदारी पार पाडताना दिसून येत आहेत मात्र, यामध्ये राजकारण शिरले आहे. त्यामुळे निष्पाप लोकांना आपला नाहक बळी सुद्धा गमवावा लागत आहे. दरम्यान कोरोनाला आळा घालण्यासाठी एकमेव उपाय तो म्हणजे लसीकरण. याआधी वयोवृद्ध यानांच लसीकरण करण्यात येत होते मात्र, आता येत्या १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यात येत असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या लसीकरणाचे श्रेय आता राजकारणी घेताना दिसून येत असल्याचे चित्र बघावयास मिळाले आहे. दरम्यान, काल अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी १ मे पासून राज्यात मोफस लसीकरणाची घोषणा केली होती. मात्र यामध्ये राज्य सरकारमध्ये मतभेद दिसून येत आहे. दरम्यान मलिक यांच्या घोषणेवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे यामध्ये कॉंग्रेस लसीकरणासाठी आग्रही आहे. पण या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा. श्रेयवादासाठी घोषणा करणं योग्य नाही असा टोला त्यांनी आज राष्ट्रवादीला लगावला आहे.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, ‘मोफत लसीकरणासाठी कॉंग्रेस आग्रही आहे. यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा केली आहे. फक्त याबाबत श्रेयवादाची लढाई योग्य नाही. याबाबतीत आग्रह धरणं हे आमचं काम आहे. पण निर्णय मात्र मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केला पाहिजे.’ पुढे ते असेही म्हणाले की, अद्याप या विषयावर मंत्रिमंडळात चर्चा सुरु आहे. त्याबाबत विचार केला जात आहे. मात्र निर्णय घेण्यापुर्वीच श्रेय घेण्यासाठी आधिच निर्णय जाहिर करणं योग्य नाही, अशी कॉंग्रेसची भूमिका आहे.
लसीकरणासाठी योग्य धोरणाची आखणी करावी लागणार असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. देशासह राज्यात येत्या १ मे पासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. यामुळे लसीकरण केंद्रावर मोठ्याप्रमाणात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे गोंधळाची परिस्थीती निर्माण होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. याबाबत मुख्य सचिवांसोबत चर्चा केली असल्याचे थोरात यांनी सांगितले आहे. तसेच येत्या दोन दिवसात धोरण निश्चित केले जाईल असे थोरात यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्य सरकार लसीकरणाबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.