रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा सुरळीत करण्यात प्रशासनाला अडचणी

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या, मृतांचे आकडे चिंता वाढवत असतानाच कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा सुरळीत करण्यात प्रशासनाला अद्याप अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारने ८ लाख रेमडेसिवीर औषधासाठी काढलेल्या निविदा (टेंडर) कडे औषध कंपन्यांनी पाठ फिरवली आहे.
ज्या दोन कंपन्यांनी सरकारी निविदा भरली आहे. त्यातील एका कंपनीने रेमडेसिवीर औषध लगेच देऊ शकत नसल्याचे सांगितले असून ३० मे नंतरच आम्ही सुरळीत पुरवठा करू शकतो, असे सांगितले आहे. तर दुसऱ्या एका कंपनीने दर दिवशी पाचशे इंजेक्शन पुरवू शकतो, असे सांगितले आहे. म्हणजे ३० मे पर्यंत या कंपनीकडून फक्त २० हजारच इंजेक्शन मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात रेमडेसिविरचा तुटवडा असताना कंपन्यांकडून मिळणारं असं उत्तर आणखी चिंता वाढवणारं आहे. विशेष म्हणजे याच कंपन्या पूर्वी सरकारला दर दिवशी ५० हजार औषधांच्या मात्रा पुरवत होत्या. मात्र, ऐन गरजेच्या काळात कंपन्यांनी सरकारला दिलेल्या या अजब उत्तराने प्रशासनासमोरील पेच वाढला आहे.
राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी खूपच मोठी असून त्या तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑक्सिजन-रेमडेसिविरची मोठी टंचाई आहे. आज राज्यात दिवसाला ६२ हजार इंजेक्शनची गरज असताना दिवसाला केवळ ३० ते ३५ हजार इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. तर दुसरीकडे दिवसाला १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असताना आजही ही मागणी पूर्ण होताना दिसत नाही. आजही ३०० मेट्रिक टनचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरुच असून आम्ही शक्य ते प्रयत्न साठा वाढवण्यासाठी करत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनातील (एफडीए) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.