Sunday, September 25, 2022
Homeराजकीयउद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होऊन खरंच चूक केली का?

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होऊन खरंच चूक केली का?

सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर राज्यात शिंदेशाही सूरु झाली. ठाकरे सरकारच्या काळातील अनेक निर्णयाला केराची टोपली दाखवत शिंदे-फडणवीस सरकार जोमाने निर्णय घेत आहेत. मात्र, दोन मंत्र्यांचं सरकार असल्याने विरोधक जोरदार टीका करत आहेत.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट अशा दोनी गटांना बहुमत सिध्द करण्याचे निर्देश दिले आहेत. “शिवसेना पक्षातील तुमचं बहुमत सिद्ध करा,” अशी सूचना केल्यानंतर आता यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

शिवसेना संकटात असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून उध्दव ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी…

तुमचं मुख्यमंत्री होणं चुकलं का? असा प्रश्न ज्यावेळी संजय राऊतांनी उध्दव ठाकरेंना विचारला, त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

“यात दोन गोष्टी आहेत. समजा मी त्यांना (एकनाथ शिंदे यांना) त्या वेळेला मुख्यमंत्री केलं असतं. त्यांनी आणखी काहीतरी वेगळं केलं असतं. कारण त्यांची भूकच भागत नाहीये. त्यांना मुख्यमंत्रीपद पण पाहिजे आणि आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय? शिवसेना प्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागला तर ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे.

‘याला हावरटपणा म्हणतात. म्हणजे दिलं तरी माझं ते माझे आणि तुझे तेही माझं, इथपर्यंत होते. आता याचं तेही माझे आणि त्याचं तेही माझं. इथपर्यंत यांची हाव गेली आहे. या हावरटपणाला काही सीमा आहे की नाही’, असा सवाल उध्दव ठाकरेंनी उपस्थित केलाय.

उध्दव ठाकरेंनी दिलेलं उत्तर म्हणजे ठाकरे भाषेला दिलेली जहाल फोडणी म्हणावी लागेल. पण खरच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होऊन चुक केली का?, असा सवाल उपस्थित होतोय.

खरंच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होऊन चुक केली?

भाजप आणि शिवसेना यांची आधीपासूनच नैसर्गिक युती होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती तुटली. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असा युतीचा फॉर्म्युला असायचा.

मात्र, 2019 साली पुन्हा युतीची गाठ बांधून एकत्र निवडणूक लढवली. यावेळी मात्र अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला असं शिवसेना सांगते. म्हणजेच मुख्यमंत्री शिवसेनाचा व्हावा अशी महत्वकांक्षा उद्धव ठाकरेंची होती.

2019 साली शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर उध्दव ठाकरे यांनी सरकारचा रथ खांद्यावर घेतला असता का?, असा सवाल उपस्थित होतो. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. शिवसेनेने यासंदर्भात भूमिका देखील स्पष्ट केली होती.

महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी शिंदेंचं नाव कसं गायब झालं?

भाजपला डच्चू देत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचा प्रयोग केला. त्यावेळी मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार हे पक्कं असताना एकनाथ शिंदे यांचं नाव समोर आलं नाही आणि उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

तुम्ही पक्षात समंजस्याची भूमिका असावी, यासाठी उध्दव ठाकरे यांचं नाव जाहीर केलं, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांनी उध्दव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, एकनाथ शिंदे या निर्णयामुळे दुखावले गेले, अशी चर्चा देखील त्यावेळी राजकीय वर्तुळात सुरू होती.

एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतुन गायब होण्यामागे संजय राऊत यांचा छुपा हात होता, असं देखील म्हटलं जातं. संजय राऊत महाविकास आघाडीचे कर्तधरता होते. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊतांचं वजन वाढत गेलं.

शिवसेना ढिल्ली सुटली-

एकीकडे मुख्यमंत्रीपद आणि दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुखाची जबाबदारी. ही तारेवरची कसरत उध्दव ठाकरे यांना जमली नाही. महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे वरून सगळं चांगलं दिसत असलं तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते नाराज होते. कोण कोणाचा विरोधक याचं गणित कार्यकर्त्यांना उमजत नव्हतं.

मुंबई महापालिका म्हणजे शिवसेनेसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी. शिवसेनेचं अर्थकारण मुंबई महापालिकेच्या भरोश्यावर आहे. त्यामुळे शिवसेनेने मुंबईत भरपूर जोर लावला. मात्र, इतर ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी काही जागा सोडाव्या लागल्या. उध्दव ठाकरे यांनी जागा वाटपबाबत ठोस भूमिका घेतली नाही, अशी टीका देखील होते.

उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात मातोश्रीची दारं बंद केली. त्यानंतर उध्दव ठाकरे आजारपणामुळे शिवसैनिकांना भेटले नाहीत. त्यात मुख्यमंत्रीपदाचा गाडा रेटण्याची जबाबदारी आल्याने शिवसेना ढिल्ली सुटली.

दरम्यान, उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होऊन शिवसेनेला फायदा होण्याऐवजी तोटा सहन करावा लागला. भाजपसोबत नैसर्गिक युती तुटली तर दुसरीकडे पक्षात सर्वात मोठं बंड झालं. त्यामुळे आता उध्दव ठाकरे यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

हे ही वाचा की-

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments