धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना याआधी मागील वर्षी जूनमध्ये पहिल्यांदा करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी त्यांनी दोन दिवसांनी ट्विट करत म्हटले होते, ‘मित्रांनो, मी बरा आहे काळजी करू नका. कोणी कसलाही त्रास करून घेऊ नका. तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचते आहे. त्यामुळे अन्नत्याग, पायपीट, नवस असे स्वतःला इजा करणारे कृत्य करू नका ही कळकळीची विनंती. तुम्हाला होणारा त्रास हा मला वेदना देणारा आहे.’

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. रश्मी ठाकरे यांनी नुकतीच ११ मार्चला कोवॅक्सिन लस घेतली होती. त्यांना वर्षा या शासकीय निवासस्थानी होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचे सुपुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही लस घेऊन सुद्धा दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. ‘माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती,’ असे धनंजय मुंडे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.तसेच मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

राज्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी राज्यात २८ हजार ६९९ कोरोना बाधित आढळून आले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *