कुंभमेळ्यातून परतलेल्या भाविकांना व्हावं लागणार क्वारंटाईन, ‘या’ राज्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहून दिल्ली सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय. हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यातून परत आलेल्या भाविकांना १४ दिवस क्वारंटाईन असणे आवश्यक आहे. देशाच्या राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढतोय. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढून दररोज नवीन विक्रम होतोय. या पार्श्वभूमीवर दिल्लीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय हा नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल काय म्हणाले?
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत परिस्थिती बिकट होत चालली आहे. शनिवारी २४ हजारांहून अधिक कोरोना केसेस दाखल झाले आहेत. कोरोनाच्या केसेस एका दिवसात १९ हजार ५०० वरून २४ हजारांपेक्षा जास्त झाल्या आहेत. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळेच कुंभहून दिल्लीला परतणाऱ्या भाविकांना १४ दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतलाय.
प्रसिद्ध महंताचे कोरोनाने निधन –
मध्यप्रदेशातील नर्मदा कुंभाची स्थापना करणारे जगतगुरूदेव डॉ. श्याम देवाचार्य महाराज यांचे कोरोना विषाणूच्या संसर्गाने निधन झाले. देवाचार्य महाराज यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतर ते हरिद्वार येथील कुंभ मेळ्यात सहभागी झाले होते. त्यांच्या निधनानंतर संत समाजात शोककळा पसरली आहे.
नरसिंह मंदिराचे प्रमुख महामंडलेश्वर देवाचार्य महाराजांच्या निधनानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. ट्वीटच्या माध्यमांतून त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.