|

वाझेशी संबंधित अनेक हँडलर सरकारमध्ये, देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप.

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई:अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधीपक्षातील अनेक नेत्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावर सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ‘गृहमंत्री यांनी राजीनामा दिला हे अपेक्षितच होते, मात्र हा राजीनामा देण्याकरता उशीर झाला आहे. एवढे गंभीर आरोप असतांना, रश्मी शुक्ला यांचा रिपोर्ट बाहेर आला असतांना राजीनामा घेतला गेला. पण मला एक कोडं पडलेलं आहे की एवढया गंभीर गोष्टी होत असताना मुख्यमंत्री हे एक चकार शब्द बोललेले नाहीत.’
फडणवीस यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी, ‘वाझे काय लादेन आहे का?’ ही एकच शेवटची प्रतिक्रिया दिलेली मला आठवते. अनिल देशमुख यांच्या राजीनामा पत्रात नैतिकतेच्या उल्लेखाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘नैतिकता ही पहिल्याच दिवशी आठवायला पाहिजे होती.’
‘समाधान याचं आहे की आधीपासून जे पुरव्यासह मांडत होतो त्याबाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे. आणखी अनेक नावे उघडकीस येतील. तपास होऊ द्या, आणखी नावे पुढे येतील. वाझेशी संबंधित अनेक हँडलर अजूनही सरकारमध्ये आहेत.’ असा गंभीर आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे.
संजय राऊतांच्या प्रतिक्रियेवर बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी अवस्था संजय राऊत यांची झाली आहे, ज्या गोष्टींचा बचाव करता येत नाही तेव्हा मग मी सरकारमधील नाही, वाचलं नाही अशा प्रतिक्रिया देतात.’

दीड वर्षात महाविकासआघाडी सरकारमधील २ मंत्र्यांचा राजीनामा
अनिल देशमुख यांच्याआधी माजी वनमंत्री संजय राठोड यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता. संजय राठोड यांच्यावर देखील गंभीर आरोप झाले होते. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात दबाव वाढल्यानंतर संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता. विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं होतं. दीड वर्षात महाविकासआघाडी सरकारमधील आधी शिवसेनेचे संजय राठोड आणि आता राष्ट्रवादीचे अनिल देशमुख अशा २ मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *