|

देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी बेळगावात जाणार? लोकसभा पोट निवडणुकीत स्टार प्रचारक

Devendra Fadnavis to go to Belgaum for campaign? Star campaigner in Lok Sabha by-election
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

बेळगाव: सलग चार वेळा बेळगावचे खासदार राहिलेले केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचं निधन झाल्यानंतर बेळगाव लोकसभा पोट निवडणूक होत आहे. येत्या १७ एप्रिल रोजी बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून २ मे या दिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं तर महत्त्वाचं ठरेलच पण त्याचबरोबर आणखी एका गोष्टीमुळे या निवडणुकीकडे लक्ष वेधले गेले आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बेळगावात प्रचार करताना दिसण्याची शक्यता आहे. बेळगावात सध्या लोकसभा पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशावेळी फडणवीस प्रचारासाठी बेळगावात येण्याची शक्यता आहे.

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत विरोधी पक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांचे नाव आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये असणारे हे एकमेव मराठी नाव असल्याचं समजतंय. मात्र देवेंद्र फडणवीसांनी बेळगावामध्ये प्रचाराकरता येऊ नये, अशी काहींची भूमिका आहे. मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची अशी भूमिका आहे.

भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीसाठी सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसतर्फे सतीश जारकीहोळी रिंगणात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मतांची विभागणी टाळण्यासाठी शिवसेनेचे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा दिला आहे. यामुळे बेळगाव मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळेल.

दरम्यान, बेळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण ८ विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी बैलहोंगल आणि बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर उर्वरित सहा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या पोटनिवडणुकीत नेमकं काय होणार याकडे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकचंही लक्ष असणार आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *