सातत्याने लॉकडाऊन,सामान्य नागरिकांचे अतोनात हाल – देवेंद्र फडणवीस
नागपूर : नागपूर मधील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीला ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कठोर लॉकडाऊनविषयी नापसंती व्यक्त केली. ‘सातत्याने लॉकडाऊन होत असल्याने सामान्य नागरिकांचे त्यामुळे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे आता संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा निर्बंधयुक्त लॉकडाऊन केला पाहिजे. शिवाय, आता लसीकरण उपलब्ध असल्याने त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.
नागपुर मध्ये केवळ ८८ केंद्रांतून सध्या लस दिली जात आहेत, तर ग्रामीण भागात ७९ केंद्रातून दिली जात आहे. एकट्या नागपूर शहरात प्रत्येक वॉर्डात एक याप्रमाणे किमान १५१ लसीकरण केंद्रांची आवश्यकता आहे. ६० वर्षांहून अधिक आणि सहव्याधी असलेले ४५ वर्षांपेक्षा अधिक हा वयोगट लक्षात घेतला तरी नागपुरात ६,८७,००० जणांचे लसीकरण एप्रिलपूर्वी होणे आवश्यक आहे. आज दिवसाला केवळ ८ ते १० हजार लसीकरण होत आहे. त्यामुळे उद्दिष्ट गाठायचे असेल तर ४० हजार लसीकरण प्रतिदिवशी होणे आवश्यक आहे. काही सामाजिक संघटनांच्या मदतीने ठिकठिकाणी लसीकरण केंद्र उघडता आले तर त्यामुळे मोठी मदत होऊ शकेल आणि लक्ष्य लवकर गाठता येईल,’ असं ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनाला सूचना
१. कोरोना रुग्णालये आणि बेड वाढवा, स्वतंत्र कोव्हिड रुग्णालये राखीव ठेवा
२. कोव्हिड वॉर्ड बंद झाले आहेत, ते पुन्हा सुरु करा
३. बिलांवर देखरेखीसाठी ऑडिटर सुरु करा
४. कार्यालये बुकिंग आहेत, ते रद्द केल्यामुळे पैसे मिळत नाहीत, SOP ठरवा
५. आम्ही सोबत आहोत, जे निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी करा
६. पूर्ण लॉकडाऊनऐवजी, निर्बंध लागू करण्याचा मुद्दा समोर आला, तो योग्य आहे
७. हळू काम सुरु आहे, त्याचा वेग वाढवा
८. सर्वाधिक मृत्यू नागपुरात होत आहेत, 50 पैकी 30-32 मृत्यू नागपूरमध्ये
९. होमक्वारंटाईन लोक रस्त्यावर फिरतायत, त्यांना सरळ उचलून क्वारंटाईन सेंटरमध्ये न्या, त्यांच्यावर कारवाई करा
१०. आयुक्तांनी फेस रेकग्नेशनबाबतची माहिती दिली, बाहेर फिरणाऱ्या लोकांना कॅमेरे ओळखतील
नागपूर लॉकडाऊन अपडेट्स
नागपूरमध्ये लावलेले कडक निर्बंध हे ३१ मार्चपर्यंत लागू करण्यात आले आहेत. पालकमंत्री नितीन राऊत यांनी तशी माहिती दिली आहे. आधी हे निर्बंध १५ ते २१ मार्चपुरता लावण्यात आले होते. मात्र नागपुरातील सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता, हे निर्बंध आता ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहेत. आज नागपुरातील सर्व लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली होती, त्यानंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी ३१ मार्चपर्यंतच्या निर्बंधाबाबत निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. मात्र निर्बंधांमुळे अर्थचक्राला कोणतीही बाधा येणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
काय सुरू, काय बंद?
१. जिवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंत खुली
२. भाजीपला दुपारी ४ वाजेपर्यंत मिळणार
३. हॉटेल, रेस्टॉरंट संध्याकाळी ७ पर्यंत खुले राहणार, ऑनलाईन पद्धतीने रात्री ११ पर्यंत डिलिव्हरीसाठी मुभा
४. परीक्षा कोविड नियमांअतर्गत होतील
५. शाळा आणि कॉलेज बंद राहणार