अनेक तांत्रिक अडचणींनंतरही पहिल्या एका तासात तब्बल ३५ लाख लोकांची लसीसाठी नोंदणी
रात्री ८ वाजेपर्यंत एकूण ७९ लाख ६५ हजार ७२० लोकांची लसीकरणासाठी नोंदणी
मुंबई : देशात १६ जानेवारीपासून जाहीर करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात होत आहे. यामध्ये १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी प्रक्रिया काल, २८ एप्रिलपासून सुरू झाली आहे.
नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीचे सीईओ आणि कोविन एम्पावर्ड कमिटीचे चेअरपर्सन आर.एस.शर्मा यांनी सांगितलं की, काल कोविन वर ७९,६५,७२० लोकांनी रजिस्ट्रेशन केलं. यापैकी अधिकांश रजिस्ट्रेशन सायंकाळी ४ वाजेपासून ७ वाजेपर्यंत झालं. ज्यांचं वय १८ ते ४४ आहे अशांनी खूप जास्त प्रमाणात नोंदणी केली आहे. प्रति सेकंद ५५ हजार लोकं पोर्टलवर होते, या दरम्यान सिस्टमनं अपेक्षेप्रमाणे काम केलं असल्याचं देखील शर्मा यांनी सांगितलं.
काल अवघ्या तीन तासांमध्ये जवळपास ८० लाख लोकांनी या पोर्टलवर आपलं रजिस्ट्रेशन केलं असल्याची माहिती मिळाली आहे. नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कोविन पोर्टलवर अडचणी आल्या मात्र नंतर (http://cowin.gov.in), आरोग्य सेतु आणि उमंग ॲप वर रजिस्ट्रेशन व्यवस्थित सुरु झालं. रात्री ८ वाजेपर्यंत एकूण ७९ लाख ६५ हजार ७२० लोकांनी लसीसाठी नोंदणी केली आहे.
या पोर्टलवर नोंदणी करताना सुरुवातीला मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागतो. त्यानंतर एक ओटीपी त्या मोबाईल नंबरवर पाठवला जातो, मात्र हा ओटीपी येत नसल्याचं समोर आलं होतं. तसेच अनेक यूजर्सनी साईट ओपन होत नसल्याच्या देखील तक्रारी केल्या. नोंदणी प्रक्रिया चार वाजेपासून कोविन अॅपवर सुरु झाली. मात्र ही नोंदणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोविन अॅपचा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर आली. सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी यासंदर्भातील तक्रार नोंदवली असून स्क्रीनशॉर्ट पोस्ट केले जात होते. ट्वीटरवर वेटिंग फॅार ओटीपी, नो ओटीपी, स्लॅाट, ओटीपीज, अपॅाईंटमेंट असे ट्रेंड सुरु होते. आरोग्य सेतू तसेच कोविन अॅपवरुन नोंदणी केली तरी मूळ नोंदणीसाठी कोविनच्या अॅपवरच नोंदणी करणाऱ्यांना रिडायरेक्ट केलं जात असल्याने कोट्यावधी युझर्स एका वेळी नोंदणीसाठी आल्याने सर्व्हर क्रॅश झालं होतं.
दरम्यान तांत्रिक अडचणीनंतरही पहिल्या एका तासात कोविन ॲपवर १८ वर्षे वयावरील ३५ लाख लोकांनी लसीसाठी नोंदणी केली असल्याची माहिती मिळालीये.