चेन्नईचा अनुभव विरुद्ध दिल्लीचा जोश! आज होणार गुरू विरुद्ध शिष्य सामना

मुंबई: IPLच्या चौदाव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नुकताच पहिला सामना झाला. या सामन्यात कोहलीच्या संघानं विजय खेचून आणला आहे. तर मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमवण्याची परंपरा कायम राखलीये.
आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामना रंगणार आहे. गुरू महेंद्र सिंह धोनी आणि शिष्य ऋषभ पंत असा गुरू शिष्य सामना रंगणार आहे. CSK विरुद्ध DC सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज संध्याकाळी ७.३०.वाजता होणार आहे.
धोनीच्या संघामध्ये युवा कमी आणि अनुभवी खेळाडू जास्त आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सकडे जोश आहे. दोन्ही संघांमध्ये दक्षिण आफ्रिकेहून आलेले खेळाडू खेळू शकणार नाहीत. त्यांना ७ दिवसांचा क्वारंटाइन वेळ पूर्ण करायचा असल्यानं त्यांना पहिला सामना खेळता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अक्षर पटेलनं जरी कोरोनावर मात केली असली तर तो पहिला सामना खेळण्याची शक्यता धुसर असल्याचं सांगितलं जात आहे.
IPLच्या मैदानात आतापर्यंत दोन्ही संघ २३ वेळा आमनेसामने आले आहेत. मात्र पहिल्यांदाच दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व ऋषभ पंतकडे असल्याने आता गुरु आणि शिष्य एकमेकांविरुद्ध खेळताना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
टीम CSK –
या वर्षी चेन्नई सुपर किंग्जने जोरदार तयारी केली आहे. पहिल्याच सामन्यात गतउपविजेत्यांना पराभूत करून विजयाने सुरूवात करण्याचा प्रयत्न असेल. चेन्नई संघात अनुभवी सुरेश रैनाचा समावेश झाला आहे. त्याच बरोबर ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्लेसिस, अंबाती रायडू, सॅम करन, मोइन अली आणि स्वत: धोनी अशी मजबूत फलंदाजी आहे. गोलंदाजीत शार्दुल ठाकूर सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याला साथ असेल ती दीपक चाहर आणि रविंद्र जडेजा या दोघांची.
टीम DC –
दिल्ली संघाचा विचार केल्यास भारतीय संघातील अनुभवी शिखर धवन, त्यानंतर पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ आणि पंत ही फलंदाजीची फळी आहे. धवनने गेल्या हंगामात सर्वाधिक ६१८ धावा केल्या होत्या. तर शॉने विजय हजारे स्पर्धेत द्विशतकासह ८२७ धावांचा पाऊस पाडला होता. या शिवाय दिल्लीकडे मार्कस स्टोयेनिस, शिमरोन हेटमायर आणि सॅम बिलिंग्स सारखे अष्टपैलू आहेत. गोलंदाजीत इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, उमेश यादव, ख्रिस वोक्स आणि एनरिक नोजे ही दमदार फळी आहे. करोना क्वारंटाइनच्या नियमामुळे रबाडा आणि नोजे पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसतील. फिरकीपटूमध्ये आर अश्विन आणि अमित मिश्रा यांच्यावर जबाबदारी असेल. अक्षर पटेलला कोरोना झाल्याने तो उपलब्ध नसेल.