दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : ‘आता तरी सरकारने या घटनेचा बोध घ्यावा’

पुणे : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी निलंबित एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डीला अटक करण्यात आली आहे. याविषयी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी समाधान व्यक्त केले आहे. हा राज्यातील प्रत्येकाचा विजय आहे ज्यांनी आवाज उठवला. आता तरी सरकारने या घटनेचा बोध घेत शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कंपनीत आयसीसी कमिटी बंधनकारक करत त्यांच ऑडीट करावे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी ट्विटद्वारे केली आहे.
हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक केलेल्या निलंबित एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डीला गुरुवारी (दि. 29) धारणी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दिपाली आत्महत्या प्रकरणात अचलपूर न्यायालयाने ठेवलेल्या गंभीर ठपक्यानंतर रेड्डीला सहआरोपी करत अटक केली आहे.
अखेर #दिपालीचव्हाण आत्महत्या घटनेत मा. अचलपूर न्यायालयाने ठेवलेल्या गंभीर ठपक्यानंतर रेड्डीला सहआरोपी करत अटक केली
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 29, 2021
हा राज्यातील प्रत्येकाचा विजय आहे ज्यांनी आवाज उठवला
आता तरी सरकारने या घटनेचा बोध घेत शासकीय/निमशासकीय व खाजगी कं॰ICC कमिटी बंधनकारक करत त्यांच ऑडीट ही व्हावं pic.twitter.com/H0JDBT9t7j
दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे वन विभागासह राज्य हादरुन गेले होते. दरम्यान दिपाली चव्हाण यांनी चार पानी सुसाईड नोट लिहली होती. त्यानंतर उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डीला निलंबीत करण्यात आले होते. त्यानंतर श्रीनिवास रेड्डी याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दीपाली चव्हाणचे पती राजेश मोहिते यांनी धारणी पोलीस ठाण्यात 26 मार्चला फिर्याद दिली होती. त्यात श्रीनिवास रेड्डी सुद्धा दीपालीच्या मृत्यूस जबाबदार असल्याने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.