अंबानींच्या घराबाहेर उभ्या केलेल्या ‘त्या’ गाडी मालकाचा मृत्यू

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन मिळाले होते. त्या वाहनाच्या मालकाचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनसुख हिरेन असं गाडीमालकाचं नाव आहे. आज अचानक यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत सापडला आहे. कळवा खाडीमध्ये उडी घेऊन हिरेन यांनी आत्महत्या केली असून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्तांनी यांनी दिली .
२५ फेब्रुवारीला अंबानी यांच्या अँटेलिया या घराजवळ एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये २० जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं खळबळ उडाली होती. ही गाडी मनसुख हिरेन यांची होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी गाडी चोरी गेल्याची तक्रार दिली होती. स्फोटक प्रकरणानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजर झाले होते. हिरेन कालपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबियांनी आज दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांचा मृतदेह सापडल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.
या प्रकरणी अज्ञाता विरोधात ग्रामदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंबानी यांच्या ताफ्यातील वाहनाचा क्रमांक आणि स्फोटके भरलेले वाहनाचा क्रमांक सारखाच असल्याचे समोर आले होते. त्या वाहनात १ पत्र सुद्धा सापडले होते.
स्फोटके भरलेले वाहन हे काही दिवसांपूर्वी मुंबईतील विक्रोळी येथून चोरण्यात आले होते. वाहनात सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्यांवर नागपूर येथील कंपनीचे नाव होते. त्या आधी काही दिवसापासून मुकेश अंबानी यांच्या घराची रेकी करण्यात येत होती. वाहनात सापडलेल्या बॅग वर मुंबई इंडियन्स असे नाव लिहिलेले होते. मुंबई पोलिसांचे १० पथके या प्रकरणाचा शोध घेत आहेत.