ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू

नाशिक: नाशिकच्या सिडकोतील एका रुग्णाला चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र प्रकृती खालावली असूनही त्यांना बेड मिळत नव्हता. लोकप्रतिनिधींही त्यांना बेड मिळावा यासाठी खासगी रुग्णालयांना विनंती केली. मात्र, त्यांनाही दाद मिळेना. अखेर रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने कोरोनाबाधित रुग्णाने ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन थेट महापालिकेच्या आवारात ठिय्या मांडला.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं समोर येत आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठी रुग्णांना वाट पाहावी लागतीये. नाशिकमध्येही कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर आहे. ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने संबंधित कोरोना रुग्णाच्या आंदोलनानं महापालिका परिसरात खळबळ माजली होती.
खडबडून जागं झालेल्या प्रशासनाने त्या रुग्णाला नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र काल मध्यरात्री दुर्दैवाने या रुग्णाचा रुग्णालयात मृत्यू झाला.
नाशिकमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यात अनेक खासगी रुग्णालयं बेड असूनही नसल्याचं कारण पुढे करत आहेत. त्यामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना रुग्णांना उपचारासाठी धावाधाव करावी लागत आहे.
आयुक्तांकडून चौकशीचे आदेश
रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना बिटको, डॉ. हुसैन हॉस्पिटल आणि वेळ पडल्यास खासगी रुग्णालयात सवलतीच्या दरात उपचारासाठी महापालिकेची धडपड सुरू आहे. मात्र, संबंधित दोन्ही रुग्णांना खरोखरच बेड मिळाले नाही का, त्यांनी कोणाशी संपर्क केला, ही स्टंटबाजी होती का, आंदोलन झाल्याने वस्तुस्थिती काय हे तपासण्यासाठी सखोल चौकशी केली जाणार तसेच यात शहरातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी म्हटलंय.