स्वराज्यसूर्य मावळल्यानंतरची पहाट!

Dawn after the setting of Swarajyasurya!
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

इसवी सन ३ एप्रिल १६८० रोजी स्वराज्य निर्मात्या छत्रपती शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला. सह्याद्रीच्या डोंगर कड्यांची आव्हाने झेलत , इथल्या मुसळधार सरी रोमारोमात मुरवत, इथली माती उपजाऊ करण्याचा – स्वराज्य तोरण बांधण्याचा निर्धार करून “रयतेचं राज्य” बांधणार्‍या शिवाजी महाराजांनी रायगडावर आपला देह ठेवला. रक्तातिसार, गुडघेदुखी, विषप्रयोग, ताप अशी अनेक कारणे बखरकार , इंग्रजी नोंदी आणि महाराणी सोयराबाईंच्या म्हणण्यानुसार दिली जातात.
मुघलांनसोबत दक्षिण मोहिमेवर असणार’ तारीख- ए -दीलकशा ‘ पुस्तकाचा लेखक भीमसेन सक्सेना लिहितो की, “शिवाजी हा एक सत्पुरुष होता, एक अद्वितीय शिपाई गडी होता, राजनीतीनिपुण होता, अत्यंत कमी संसाधनातून त्याने राज्य उभे केले”. तर दस्तुरखुद्द औरंगजेब म्हणतो की, “शिवाजी मोठा लढवय्या होता, येथील प्राचीन राज्ये बुडवण्याचा प्रयत्न मी सलग १९ वर्षे चालला असताना सुद्धा त्याचे राज्य वृद्धिंगत होत होते.” तर शिवाजी महाराजांचे प्राणोत्क्रमण झाल्याचे समजताच गोव्याचा गव्हर्नर लिहितो की’ हे राज्य आता भयग्रस्त स्थितीतून वाचले, शिवाजी महाराजांचा शांतता काळ आक्रमण काळापेक्षा जास्त धोकादायक होता.” या आणि अशाच त्रयस्थ किंवा अगदी शत्रूच्याही प्रतिक्रिया बारकाईने अभ्यासल्या तर आपल्या निधनानंतरही शिवाजी महाराजांनी स्वराज्याची दूरदृष्टीने केलेली बांधणी, तिच्या मागची तात्विक बैठक आणि चातुर्य दिसून येते.
खरे पाहता पायरीचा दगड रोवताना खरे धारिष्ट लागते. त्यासाठी बांधणीसाठीचा विश्वास जनमाणसात पक्का करावा लागतो. बलाढ्य मुगल सल्तनत हिंदुस्थानावर राज्य करत असताना स्वतःचे राज्य निर्माण करण्याची आणि त्याचे संतुलित व्यवस्थापन करण्याची मनीषा शिवरायांनी पुढच्या पिढ्यात निर्माण केली. त्यानंतरचे छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई आणि कैदेतले शाहू महाराज अशीच झुंजार फळी स्वराज्याला लाभली. ज्यांनी कुळवाड्यांचे हे राज्य प्राणपणाने जपले आणि या दख्खनेनेच औरंगजेबाची कबर खोदली.
‘ लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ‘हे जरी खरं असलं तरी त्या पोशिंदा ने दिलेल्या वर्षाला जपणारी रणझुंजार पिढी या मातीत निपजली तिने अटकेपार झेंडे लावले. मध्ययुगीन इतिहासाच्या तर्कानुसार अचाट, अद्वितीय राज्य स्थिरावून दाखवले. चहूबाजूंनी गनीम टपलेला असताना ही खचितच सोपी गोष्ट नव्हती. पुढे पेशवेकाळातला बहर आणि उतार सर्वश्रुतच , परंतु झुंजण्याचा चिवटपणा टिकवून ठेवणाऱ्या मराठीजनांनी शिवरायांचा हा स्वराज्य विचार , पुरोगामी दृष्टीकोण वेळोवेळी उचलून धरला.
अगदी ब्रिटिश आमदानीत सुद्धा मराठ्यांचे पराक्रम उल्लेखनीय आहेत. भौगोलिक दृष्टिकोनातून बघायचे झाले तर उंचीने मध्यम आकाराची , सावळी परंतु , चपळ अशी अंगकाठी असणारी ही महाराष्ट्रातील रयत फक्त आणि फक्त इथल्या महान वारशाच्या आधारावर स्वयं निर्धारित राहिली. समाज म्हणून असणाऱ्या उणिवा निपजल्याही इथे अनेकदा पण त्याला विवेकाने नेहमीच समज दिली.आज शिवराय आठवताना कुणाचा द्वेष आठवत नाही तर सर्व धर्मीयांना समान लेखणारा , सर्व स्त्रियांचा आदर करणारा , न्यायाने वागणारा , चारित्र्यसंपन्न असा जाणता राजा आठवतो. अभ्युदयाची पहाट हीच असावी कदाचित.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *