शिर्डीत आता दर्शन पास बंद; संस्थानाने घेतला ‘हा’ निर्णय
शिर्डी: साई मंदिरात दर्शनासाठी दररोज हजारो-लाखो भाविक येत असतात. भाविकांना कोणत्याही तसदीविना साईदर्शन करता यावे यासाठी संस्थानाचा पुढाकार असतो. सध्या शिर्डीतील तापमानाचा विचार करता. शिर्डी साईबाबाबा संस्थानाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानवाढ सुरू आहे. शिर्डीतदेखील उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे.
साईबाबा संस्थानने शहरातील सर्व सशुल्क व मोफत दर्शन पास वितरण केंद्रे सकाळी साडे अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थानने जाहीर केले आहे. दुपारच्या वेळेत पास वितरण केंद्रे बंद राहणार असली तरी दर्शन रांग व ऑनलाईन पासेस व्यवस्था सुरू राहणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी संस्थानने तीन ठिकाणी ऑनलाईन पासेस काढण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. बंद करण्यात आलेल्या सहा पैकी साईबाबा भक्तनिवास, साईआश्रम, द्वारावती, भक्तनिवास या तीन ठिकाणी ऑनलाईन पासेस उपलब्ध असणार आहेत.
याशिवाय भाविकांना साई संस्थानचे संकेतस्थळावर सायबर कॅफे, टॅब आदींबरोबरच स्मार्ट फोनच्या माध्यमातूनही ऑनलाईन सशुल्क व मोफत दर्शन पासेस काढता येणार आहेत. सध्या साईबाबा भक्तनिवास, साईआश्रम, द्वारावती भक्तनिवास, श्रीराम पार्किंग मधील मोफत दर्शन पासेस केंद्र, दर्शनरांग गेट क्रमांक एक लगतचे सशुल्क दर्शन पास केंद्र व बसस्थानक या ठिकाणी सशुल्क व मोफत पासेस बायोमेट्रिक पद्धतीने मिळत होते. यापुढे या सर्व केंद्रावर सकाळी साडेअकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत बायोमेट्रिक पद्धतीचे पास वितरण बंद ठेवण्यात येणार आहे. कोविड तसेच मार्च, एप्रिल व मे महिन्यातील तीव्र उन्हाळा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे