तुरुंगात माझ्या जीवाला धोका – बाळ बोठे
नगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात अडवून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. ३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर ही घटना घडली होती. यावेळी गाडीत बसलेल्या रुणाल याने मारेकऱ्यांना पाहिलं होतं. त्याच्याच मदतीने पोलिसांनी तातडीने ५आरोपींना गजाआड केलं. मात्र, जेव्हा या आरोपींची चौकशी करण्यात आली, तेव्हा या हत्याकांडात शहरातील पत्रकार बाळ बोठे असल्याचं समोर आलं. बाळ बोठेने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा जबाब या आरोपींनी दिला. हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर अहमदनगर पोलिसांनी हैदराबादमधून ताब्यात घेतले.
दरम्यान अटकेत असलेल्या बाळ बोठे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मात्र, कोतवाली पोलिसांनी आरोपीला विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्याचा अर्ज दिला. तो न्यायालयाने मंजूर केल्याने पोलीस त्याला नगरला घेऊन आले.
आता मात्र आरोपी बाळ बोठे याने नगर आणि येरवड्याच्या तुरुंगात आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे व नाशिक कारागृहात मला ठेवावे अशी विनंती केली आहे. ‘पत्रकारिता करत असताना ज्यांच्याविरोधात बातम्या दिल्या, त्यातील काही जण नगर व येरवड्याच्या तुरुंगात आहेत. मलाही त्याच ठिकाणी ठेवले तर माझ्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे मला नाशिकच्या तुरुंगात ठेवण्यात यावे’, अशी मागणी बाळ बोठे याने केली आहे. त्याच्या वकिलांनी न्यायालयात हा अर्ज केला आहे, त्यावर न्यायालयाचा निर्णय अद्याप बाकी आहे.