स्वातंत्र्य चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांच्या भरवशाचा निवारा म्हणजे ‘डाग मळा’!
१९४२मधे महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना ‘चले जाव’चा आदेश दिला आणि त्या आदेशानं लोकांच्या मनात सरकारविषयीचा असंतोष अधिक वाढला होता. गांधीजींच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिला. चले जाव चळवळ हे देशव्यापी आंदोलन बनलं. लोकांनी उत्स्फूर्तपणे गावा-गावात सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. गांधींजी आणि अनेक नेते तुरुंगात गेल्यावर या आंदोलनाला कुणी नेतृत्वही नव्हतं. त्यानंतर हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी ब्रिटिश सरकारने आंदोलनकर्त्यांची धरपकड चालू केली. त्या दरम्यान देशात आणि महाराष्ट्रात भूमिगत चळवळीचा जन्म झाला. या चळवळीचे स्वरूप विस्तारत गेले. आणि मोठ्या प्रमाणार जोर धरू लागली. महाराष्ट्रातले समाजवादी नेते अच्युतराव पटवर्धन यांनी भूमिगत चळवळ अखिल भारतीय पातळीवर नेली.
त्यावेळी ‘डाग मळा’ भूमिगत कार्यकर्त्यांचा भरवशाचा निवारा होता. इंग्रजांनी चालवलेला पाठलाग चुकविण्यासाठी वारणा काठचा कोरे कुटुंबियांचा ‘डाग मळा’ हा त्यांचा आसरा होता. डाग मळ्यातील उसाचा फड त्यांच्या लपण्याची सुरक्षित जागा होती. साताऱ्याहून डाग मळ्यात आले की संस्थानी हद्दीत प्रवेश होत, त्यामुळे संस्थानी पोलिसांना खबर मिळून त्यांचा ससेमिरा लागेपर्यंत बरीच उसंत मिळायची. अशा वेळी या भुमिगत कार्यकर्त्यांची सर्व प्रकारची सेवा करण्याची संधी कोरे कुटुंबीयांना मिळाली. भूमिगत कार्यकर्ते पंचवीस-तीसच्या संख्येने नेहमीच डाग मळ्यात असायचे. डाग मळ्यावर येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवास अपाय होऊ नये म्हणून कोरे कुटुंबीयांचे मित्र मंडळ देखील फार जागरूक असायचे.
पोलीस जर पार्टी छाप्यासाठी येत असतील तर त्याची माहिती कोरे कुटुंबीयांना आधीच पोहोचवली जात असायची. अखेर हे काम देशाचे होत. स्वातंत्र्य चळवळीचे होते. ४२ ची क्रांती यशस्वी होण्यामध्ये भूमिगत कार्यकर्त्यां सोबतच शासनामध्ये विविध अधिकाराच्या पदावर काम करणाऱ्या देशभक्त सेवकांचाही वाटा तितकाच मोठ्या मोलाचा आहे.
एकदा कोणतेही कार्यकर्ते हजर नसताना पोलिसांची जंगी तोफ झडतीसाठी डाग मळ्यावर आली. अगदी अपरात्री पोलीस येणे हे त्या कुटुंबीयांसाठी नवीनच होते. या झडतीची माहिती खबऱ्यांना देखील नव्हती. पोलिसांनी संपूर्ण ६० एकरची शेत, उसाचे फड तपासून पाहिले. गोठा, घरी, शिवार व पालापाचोळ्यापर्यंत कसून तपासले. बारीक चौकशी देखील केली. प्रत्येक कानाकोपरा धुंडाळून काढला. पण त्यांच्या हाती काहीही लागले नाही. दमलेल्या पोलिसांना कोरे कुटुंबीयांनी जेऊ-खाऊ घातले. आणि म्हणाले की, “कशाला एवढे त्रासात पडता, अहो आमचा व्यवसाय तरी काय आहे. शेती! बरे झाले एकदाची तुम्हा सर्वांची खात्री झाली. डाग मळ्यावर चळवळीतील कोणीही येत नाही. तरीही आम्ही सांगनं वेगळं आणि तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेणे वेगळं. शेवटी काय तुम्हालाही जाब विचारणार कोणी तरी आहेच ना?” पोलीस परतले आणि पुन्हा कधीही डाग मळ्यावर फिरकले नाहीत. त्यानंतर खबरी कोरे कुटुंबीयांना म्हणाले की, मुद्दामच तुम्हाला आधी आम्ही सांगितलं नव्हतं. पोलिसांना एकदाचा काय तो हेलपाटा पडू देत म्हणजे नंतर ते कधीही डाग मळ्याकडे फिरायची नाहीत”.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कोरे कुटुंबीय कोण आहेत?
मुरबाड माळातून नंदनवन उभारणारे सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे हेच होते. भूमिगतांना त्यांच्या डाग मळ्यात आश्रय देणारे ते थोर स्वातंत्र्य सैनिक व समाजसुधारक होते. स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले होते. प्रतिसरकारच्या भूमिगत क्रांतिकारांना आश्रय देण्याचे त्यांचे अमुल्य योगदान स्वतंत्र भारत कधीही विसरू शकणार नाही. ते १९३९ मध्ये कोल्हापूरला स्थापन झालेल्या प्रजा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यारंभ केला.
त्यांच्या ‘मी एक कार्यकर्ता’ या आत्मचरित्रात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील बरेच किस्से सांगितलेले आहेत. त्यातला १९४२ मधला एक प्रसंग म्हणजे, त्यांचे अडत्याच दुकान कोल्हापुरात होते. तेव्हा एक क्रांतिकारक गौरीहर सिंह हे वेषांतर करून दीड वर्ष तात्यासाहेब कोरे यांच्या घरी राहात असायचे. पैलवान नावाने ते ओळखले जात असे. एकदा पोलीसांना बातमी कळाली आणि ते तपासासाठी कोरे यांच्या घरी आले. पण त्या आधीच पोलीस येणार अशी बातमी कोरे यांच्या कानावर आली होती. त्याच वेळी त्यांनी कोल्हापुरात असलेल्या अडत्याच्या दुकानात त्या भूमिगत क्रांतिकाऱ्याला लपवून ठेवले व सर्व प्रकारचं संरक्षण दिले. इकडे त्यांच्या घराची कसून तपासणी केली होती पण हाती काहीही लागले नव्हते.
साधारण १९४४ चा एक प्रसंग सांगायचा झाल्यास, त्याकाळी गारगोटी सरकारी खजिन्यावर पडलेला दरोडा फारच गाजला होता. प्रसिद्ध कांतिकारक स्वामी व वारके हे त्यावेळी झालेल्या गोळीबारात ठार झाले होते. या गारगोटी दरोड्यात तात्यासाहेब कोरे यांचे नातेवाईक सुद्धा गजा आड झाले होते. त्यावेळी क्रांतिकारकांनी अगदी योग्य वेळी पहारेकऱ्यांच्या बंदुकी ताब्यात घेतल्या होत्या आणि खजिना आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याच वेळी एक पहारेकरी खिडकीत लपून बसला होता. त्याने अचूक नेम धरून या कार्यकर्त्यांना जखमी केले होते. स्वामी व वारके मारले गेले. खजिना लुटण्याचा प्रसंग यशस्वी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत या कार्यकर्त्यांना कोल्हापूर येथे आणण्यात आले. त्यात श्री गजाननराव वाले हेही होते. त्यांना जखमी अवस्थेत कोरे यांच्या घरी अचानक आणण्यात आले. त्यांच्यासह इतर सर्व क्रांतिकारकांची योग्य ती सेवा-सुश्रुषा करण्यात कोरे कुटुंबीयांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही.
अशाप्रकारे या ‘डाग-मळ्याचे” १९४२ क्रांतीकाळातील आणि एकूणच स्वातंत्र्य चळवळीतील योगदान हे कधीही न पुसता येणारा पडद्यामागील इतिहास आहे.