राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पंढरपूर: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणूक नेहमीच चर्चेत राहिली. २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत बदल झाला आणि निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले भारत भालके ‘जायंट किलर’ ठरले. पुढे २०१४ मध्ये भालके यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून सध्याचे विधान परिषद सदस्य असलेले प्रशांत परिचारक यांचा पराभव केला. मोदी लाटेतही भालके विजयी झाले होते. ऑक्टोबर २०१९ मध्ये भालके  यांनी काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीचा पर्याय स्वीकारला. भाजपने तेव्हा सुधाकरपंत परिचारक या जुन्या जाणत्या नेत्याला रिंगणात उतरवले होते, पण भालके यांनी हॅट्रिक केली होती. तीन निवडणुकांमध्ये तीन वेगवेगळ्या पक्षांकडून निवडून येण्याचा विक्रम भालके यांनी केला होता. विरोधकांच्या मताचे विभाजन करणे आणि सामान्य मतदारांशी असलेली नाळ यामुळे भालके विजयी होत गेले. मात्र त्यांच्या अकाली निधनाने रिक्त जागेवर निवडणूक जाहीर झाली.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला असून १७ एप्रिला मतदान होणार आहे. तर २ मे ला मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात २३ मार्चला नोटिफिकेशन जारी होणार असून, २३ मार्च ते ३०  मार्च दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असणारे यावेळी उमेदवारांना आपला अर्ज दाखल करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ३१ मार्चला या अर्जाची छाननी केली जाईल तसेच ३ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमात दिली गेली आहे. विधानसभा पोटनिवडणुकीचं मतदान १७ एप्रिल रोजी तर मतमोजणी २ मे २०२१ ला पार पडणार आहे.

या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके अथवा पुत्र भगीरथ भालके यांच्यापैकी एक नाव निश्चित केले जाणार असल्याची शक्यता आहे. भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडून एका गटाने भालके परिवारात उमेदवारी देण्यास विरोध केल्याने अजित पवार यांना पंढरपूरला यावे लागले. उमेदवार ठरवण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या श्रीयश पॅलेस येथे झालेल्या कार्यक्रमाला कोरोनाचे नियम डावलून शेकडोंनी गर्दी जमा झाली होती. अखेर कोरोना नियमांचे पालन न झाल्याने या कार्यक्रमाचे आयोजकांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक अजित पवार यांनी पहिल्या टप्प्यात पंढरपूर व मंगळवेढा या भागातील विविध शिष्टमंडळाची भेट घेताना प्रत्येक शिष्टमंडळात २० सदस्य बंधनकारक केले होते. मात्र कार्यालयाबाहेर खूप मोठ्या संख्येने जमा झालेले राष्ट्रवादी समर्थक या कार्यालयात घुसल्यानंतर येथे हे सभा झाली. ज्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र हे होत असताना कोरोनाचे सर्व नियम डावलण्यात आल्याने निवडणुकीसाठी नेमलेल्या छायाचित्रीकरण पथक प्रमुख मिघाराज कोरे यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडावे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे डीवायएसपी विक्रम कदम यांनी सांगितले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *