एक जोडी बूट अन् टी-शर्टसह मैदानात उतरलेल्या पोरानं, ब्राॅडला धू-धू धूतलंय…

भारताला फलंदाजांची खाण समजली जाते. सुनिल गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडूलकर, युवराज सिंह, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली असे अनेक महान फलंदाज भारताने जगाला दिले आहेत. मात्र, चांगले बाॅलर्स मिळणं हे भारतासाठी नेहमी दुखणं राहिलं आहे.
झहीर खाननंतर भारताला त्या लेवलचा बाॅलर कधी मिळाला नाही. मात्र, 2013 साली मुंबई इंडियन्सच्या संघातून एक अस्सल हिरा भारताला मिळाला… त्याचं नाव जसप्रीत बुमराह.
बुमराह सध्या जगातील सर्वात धोकादायक गोलंदाज… अनेक बड्या फलंदाजांच्या दांड्या गुल करणारा गोलंदाज म्हणून बुमराहकडे पाहिलं जातं. बुमराह मागील काही दिवसांपासून दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर होता. त्यानंतर आता बुमराह टीम इंडियात परतला आहे.
ब्राॅडला धू-धू धूतलं-
इंंग्लंडच्या स्टूअर्ड ब्रॉडने एका षटकात 35 धावा घेऊन एक लाजिरवाणा विश्वविक्रम केला. कसोटी इतिहासातील हे सर्वात महागडे षटक ठरले. त्याला कारण ठरला जसप्रीत बुमराह. होय आपला जस्सी…
बर्मिंगहॅमच्या मैदानावर 375 धावांच्या स्कोअरवर टीम इंडियाला 9 वा झटका बसला. राजपुती स्टाईलने शतक साजरा करणारा जडेजा पॅव्हेलियनमध्ये परतला. तेव्हा 400 धावांपर्यंत पोहोचण्याची क्वचितच कोणाची अपेक्षा होती. अशावेळी प्रथमच भारताचं नेतृत्व करणारा बुमराह मैदानात आला.
जस्सीला आपण बाॅलिंगमध्ये कमाल करताना पाहिलं आहे. पण बॅटिंगमध्ये जस्सी कमाल करेल, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. 84 वी ओव्हर घेऊन स्टूअर्ड ब्रॉड मैदानावर आला. या षटकात एकूण 35 धावा झाल्या, हा कसोटी क्रिकेट इतिहासातील एक विक्रम आहे.
यापूर्वी कोणत्याही गोलंदाजाने एका षटकात 28 पेक्षा जास्त धावा दिल्या नाहीत. बुमराहच्या या खेळीनंतर सर्वांना 2007 साली भारताचा महान फलंदाज युवराजने केलेल्या कामगिरीची आठवण झाली. युवराजने याच स्टूअर्ड ब्रॉडला 6 चेंडूत 6 षटकार खेचले होते.
जस्सीचा संघर्षमय प्रवास-
बुमराहचा जन्म 6 डिसेंबर 1993 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. लहानपणापासून जस्सीला क्रिकेटचं खूप येड. तो फक्त 5 वर्षांचा असताना त्याला आपल्या वडिलांना गमवावं लागलं. वडिलांच्या निधनानंतर बुमराह कुटुंबिय अस्वस्थ झाले. त्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं.
छोट्या जस्सीकडे एक जोड शूज आणि एक टी-शर्ट होता. तो रोज धुवून पुन्हा पुन्हा वापरायचा. संघर्ष खडतर होता पण बुमराहने कधीही हार मानली नाही. वयाच्या 14 व्या वर्षी बुमराहने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता.
बुमराहला नेहमीच वेगवान चेंडू टाकण्याची आवड होती. शाळकरी मुलांपासून ते आजूबाजूच्या मुलांपर्यंत सगळ्यांविरुद्धच्या सामन्यात तो वेगवान गोलंदाजी करायचा. सततच्या आवाजामुळे बुमराहच्या आईने त्याला परिसरात क्रिकेट खेळण्यास मनाई केली.
जसप्रीतच्या कारकिर्दीबाबत त्याची आई द्विधा मनस्थितीत होती. अशा परिस्थितीत बुमराहने फ्लोअर स्कर्टिंगवर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फ्लोअरवर स्कर्टिंग करत गोलंदाजी करताना बुमराहने यॉर्कर टाकण्याची कला पारंगत केली.

आईने आता मुलाची प्रतिभा ओळखली होती आणि तिला खात्री होती की पुढे मुलगा या क्षेत्रात खूप नाव कमवेल. बुमराहची आई प्राथमिक शिक्षिका होती. त्यामुळे तिला जस्सीकडे लक्ष देणं शक्य नव्हतं. पण जस्सीने शाळेत जाण्याच्या आधी आणि शाळा सुटल्यानंतर आपला सराव सुरू ठेवला.
गली क्रिकेट खेळता खेळता जस्सीची गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या शिबिरासाठी गोलंदाज म्हणून निवड झाली. इथून जस्सीच्या यशाला सुरूवात झाली. लवकरच त्याची एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये निवड झाली.
सौराष्ट्र विरुद्ध गुजरात अंडर-19 संघात खेळण्यासाठी जस्सीची निवड झाली. या सामन्यात बुमराहने फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर 7 विकेट घेतल्या आणि सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या. त्याचवेळी मुंबई इंडियन्ससाठी खेळाडूंचा शोध सुरू होता.
2003 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला नेणारे प्रशिक्षक जॉन राईटने 7 विकेट घेतल्यानंतर बुमराहचा मुंबई इंडियन्समध्ये समावेश केला. इथून बुमराहचे आयुष्य पूर्णपणे बदललं. जॉन राईट आणि लसिथ मलिंगाने बुमराहच्या गोलंदाजीला धार देण्याचा प्रयत्न केला.

बुमराहने विराट कोहलीला आयपीएल पदार्पणातच बाद केलं. या सामन्यात जस्सीने 2 बळी घेतले. बुमराहला त्याच्या साइड आर्म अॅक्शनमुळे वेगळी ओळख मिळाली. आपल्या लाडक्या लेकाला टीव्हीवर खेळताना पाहताना जस्सीच्या आईला अश्रू अनावर झाले.
दरम्यान, आज बुमराह अनेक दिग्गज खेळाडूंचे स्टंप उडवताना दिसतो. सध्या सुरू असलेल्या भारत विरूद्ध इंग्लंड सामन्यात बुमराहने दिमाखदार कामगिरी केल्याचं पहायला मिळतंय. आतापर्यंत इंग्लंडची सलामी जोडी फोडण्यात बुमराहला यश आलं आहे. तर बुमराहची गोलंदाजी आग ओकत आहे. आगामी काळात भारताला विश्वविजेता बनवण्यात बुमराहचा मोलाचा वाटा असणार हे मात्र नक्की.
हे हे वाचा की-