IPL मध्ये कोरोनाचा शिरकाव; चाहते चिंतीत!
मुंबई: मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचं संकट अधिक चिंतेत टाकणारं होतं आहे. ९ एप्रिलपासून IPL सुरू होत असतानाच आठवडाभर आधी रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. याच दरम्यान खेळाडूंमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग होत आहे. नुकताच दिल्ली कॅपटिल्समधील अक्षर पटेलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा जवळपास १६ च्या आसपास पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मैदानाची देखभाल करणाऱ्या ८ ते १० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची घटना नुकतीच ताजी आहे. तर इव्हेंट मॅनेजमेंटमधील ६ जणांचे रिपोर्ट आज कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईसह महाराष्ट्रात सतत्याने कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. स्पोर्टस्टारनं दिलेल्या वृत्तानुसार १९ जणांची सुरुवातीला कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी सुरुवातीला तीन जणांचे आणि त्यानंतर १ एप्रिलला उर्वरित ५ ते ७ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आज पुन्हा इव्हेंट मॅनेजमेंट टीममधील ६ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
दिवसेंदिवस वाढणाऱ्य़ा या आकड्यांमुळे आता वानखेडे स्टेडियमवर काय आणखीन सुरक्षा वाढवण्यात येणार? सामने होणार की नाही यासरखे अनेक प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहेत. १४ व्य़ा हंगामातील १० सामने वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. वाढते कोरोनाचे आकडे ही चिंतेत टाकणारी बाब आहे. त्यामुळे IPLवरचं कोरोनाचं सावट अधिक वाढताना दिसत आहे.