कोरोनामुळे साताऱ्यातील संपूर्ण गाव लॉकडाऊन
पुणे: राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात असणारे घारेवाडी गावात १६ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे.
या कोरोना बाधितांवर गावातच उपचार करण्यात येत आहे. तसेच इतर १०० जणांचे नमुने घेण्यात आले आहे. शनिवारी या गावची यात्रा होती. त्यामुळे अधिक रुग्ण आढळून येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णसंख्या वाढल्याने प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांनी गाव सील करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभाग विशेष लक्ष ठेवून आहे. पोलीस प्रशासनाने घारेवाडीतील सर्व रस्ते बंद केले आहेत. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गावातील दूधविक्रेते आणि किराणा दुकानदार यांच्यामुळे कोरोना बाधितांच्या संखेत वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.
कोरोनाची दुसरी लाट आली का अशा प्रकारची भीती निर्माण झाली आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यात शाळा, महाविद्यालये १४ मार्च पर्यंत बंद ठेववण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.