अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात कोरोना वाढला?
दिल्ली: देशभरात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. महाराष्ट्रात बाधितांची संख्या चिंता वाढविणारी बाब आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे. त्यात राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. कॅनटेन्मेंट झोन वर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्रात अॅक्टिव्ह रुग्णाची संख्या चिंता वाढविणारी आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची वाढती संख्या वाढण्यामागे अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आहे असे पत्रात लिहिले आहे. राज्य सरकारचे अधिकारी अॅक्टिव्ह केसचे ट्रेकिंग, टेस्टिंग आणि विलगीकरण आदी लक्ष देऊन करत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी कोरोना बाधितांवर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे लिहिले आहे. कॅनटेन्मेंट झोन मध्ये बाधितांचा शोध घ्यावा. तसेच प्रत्येक अॅक्टिव्ह केस मागे २० ते ३० जणांना ट्रेस करण्यात यावे.
तसेच या पत्रात रात्रीची संचारबंदी आणि शनिवारी, रविवारी करण्यात येणारा जनता कर्फ्यूमुळे काही फरक पडत नसल्याचे जाणवत आहे. यामुळे कॅनटेन्मेंत झोन मध्ये अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, सोमवारी राज्यात १५ हजार ५१ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच गेल्या २४ तासात ४८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर नागपूर शहरात एक आठवड्याचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे.