कोरोनाच्या उद्रेकामुळे ‘या’ देशात जाता येणार नाही

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट भारतामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवणारी ठरत आहे. येणाऱ्या काही दिवसात कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांमधून भारतात प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
यामध्ये प्रामुख्याने युएई, ऑस्ट्रेलिया, ओमान या देशांनी भारत प्रवास करण्यास बंदी घातली आहे. कॅनडाने भारतातून उड्डाण होणाऱ्या विमानांवर ३० दिवसांची बंदी लागू केली आहे. अशा अनेक देशांनी आपल्यावर प्रवासाची बंदी लागू केली आहे. अर्थात कोरोनाच्या उद्रेकामुळे अनेक देशात जाता येणार नाही आहे, तसंच त्या देशातून भारतातही येता येणार नाही आहे.
पाकिस्तान, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, हाँगकाँग, सिंगापूर, ओमान, फ्रान्स, युएई, सौदी अरेबिया, कॅनडा इ. या देशांनी भारतात येण्यास किंवा भारतातून या देशांमध्ये जाण्यास बॅन लागू केला आहे. देशातील कोरोनाची वाढती आकडेवारी लक्षात घेता संबंधित देशांच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
म्युटेशन कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या भीतीमुळे हाँगकाँग सरकारने २० एप्रिलपासून १४ दिवसांसाठी भारतातून येणाजाणाऱ्या पॅसेंजर फ्लाइट्सवर बंदी आणली आहे. मुंबईतून हाँगकाँगमध्ये पोहोचलेले काही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानने देखील दोन आठवड्यासाठी भारतातील प्रवासासाठी बंदी आणली आहे.
ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी भारतातील दौरा रद्द केल्याच्या दुसऱ्याच दिवशी इंग्लंड सरकारने भारताला ‘रेड लिस्ट’ मध्ये टाकलं आहे. ब्रिटिश नागरिकांना भारतातून आल्यानंतर ११ दिवस क्वारंटाइन व्हावं लागणार आहे, इतर लोकांना भारतातून इंग्लंडमध्ये येण्याची परवानगीच नाहीये. एअर इंडियाने देखील भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या-येणाऱ्या फ्लाइट्स २४ ते ३० एप्रिल दरम्यान बंद केल्या आहेत. युनायटेड स्टेट्सच्या Centers for Disease Control and Prevention (CDC) देखील २० एप्रिल रोजी नोटिफिकेशन जारी करत भारतातून प्रवास टाळण्यास सांगितले आहे.
न्यूझीलंडमध्ये देखील भारतीय व्हेरिएंटच्या १७ केसेस आढळून आल्यानंतर प्रशासनाने भारतातील प्रवासावर बंदी आणली आहे. कॅनडाने देखील भारत आणि पाकिस्तानमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी आणली आहे. याठिकाणी कार्गो फ्लाइट्स सुरू राहणार आहेत. सौदी अरेबियाने २० देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर देशात येण्याची बंदी आणली आहे, त्यात भारताचा समावेश आहे. युएईमध्ये देखील २४ एप्रिलपासून १० दिवस भारतातून येणाऱ्या फ्लाइट्सवर बंदी आहे.