CSK च्या संघात कोरोनाचा शिरकाव!

मुंबई: IPL वर कोरोनाचं संकट आहेच पण देशातील वाढत्या कोरोनासोबत आता IPL मध्ये कोरोनानं शिरकाव केला आहे. कोलकाता संघातील दोन खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आज होणारा बंगळुरू विरुद्ध सामना तात्पुरता स्थगित केला आहे. हा सामना रिशेड्युल केला जाणार आहे.
कोलकाता आणि बंगळुरू पाठोपाठ आता चेन्नई संघाचं टेन्शन वाढलं आहे.
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यात संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, लक्ष्मीपती बालाजी आणि एक बस क्लीनरचा समावेश आहे. दिलासा देणारी एक गोष्ट म्हणजे, संघातील कोणत्याही खेळाडूला किंवा अन्य कोणालाही करोनाची लागण झालेली नाही. हे सर्व खेळाडू दिल्लीत आहेत. बालाजी हा भारताचा माजी जलद गोलंदाज आहे. तो शनिवारी संघासोबत डगआउटमध्ये होता. त्याच दिवशी मुंबई आणि चेन्नई संघाची मॅच झाली होती.
कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना करोना झाल्याचे वृत्त समोर आले होते. यामुळे आज होणारी कोलकाता आणि बेंगळुरू मॅच पुढे ढकलण्यात आली आहे. कोलकाता संघातील दोन्ही पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आलं असून त्यांच्यावर डॉक्टर्सची नजर राहणार आहे. चेन्नईच्या फ्रांचायझीमध्ये कोरोना शिरल्यानं आता टेन्शन वाढलं आहे.