ठाकरे सरकारच्या कामगिरीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी व्यक्त केलं समाधान

गोर-गरिबांना मोफत लस द्यावी, अशी व्यक्त केली इच्छा
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून मोफत लसीकरणाची तयारी सुरू आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना फोन करून राज्याच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. तसंच, गोर-गरिबांना मोफत लस द्यावी, अशी इच्छाही बोलून दाखवली आहे.
महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर मतभेद गेल्या काही दिवसात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना एक पत्र पाठवले होते. ते या पत्रांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर संदर्भात महाराष्ट्रातील वस्तुस्थितीची जाणीव करून दिली होती. यानंतर आज सोनिया गांधी आणि बाळासाहेब थोरात यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती काय आहे, काय योजना आखण्यात आली आहे. राज्याला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होत आहे का, याबाबत चर्चा केली. राज्यातील कोरोना परिस्थिती आणि उपाययोजना याबाबत सोनिया गांधी यांनी जाणून घेतले.
कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारन निकाराची लढाई देत आहे. शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेनं काम करत आहे. राज्य सरकारच्या कामाबाबत सोनिया गांधी यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसंच,राज्यातील सध्याची आरोग्य यंत्रणेची परिस्थिती, उपलब्ध ऑक्सिजन साठा, इंजेक्शनची उपलब्धता या विषयांवर चर्चा झाली असून राज्यातील काही अडचणीचे विषय देखील सोनिया गांधी यांच्यासमोर बाळासाहेब थोरात यांनी मांडले असल्याचं समजतंय.
महाविकास आघाडी सरकार राज्यातील चालू परिस्थिती सुधारण्यासाठी काय काय प्रयत्न करत आहेत याची देखील माहिती थोरात यांनी सोनिया गांधी यांना दिली आहे. तसंच राज्यातील राजकीय पेचप्रसंग, केंद्र सरकारबरोबरचे ताणतणाव यावर देखील राजकीय चर्चा झाल्याची माहिती मिळतीये.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि केंद्र सरकार यांच्यात वाढलेले तणाव, दररोज राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून केंद्र सरकारवर होत असलेली टीका, त्यानंतर केंद्र सरकारने वेगवेगळ्या भूमिकांवर राज्य सरकारची केलेली अडवणूक या विषयांवर देखील सोनिया गांधी आणि थोरात यांच्यामध्ये चर्चा झाली.
तसंच, महाराष्ट्रात गरिबांना मोफत लसीकरण झाले पाहिजे, अशी भूमिकाही सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा थोरात यांच्याकडे व्यक्त केली आहे. याआधीही सोनिया गांधी यांनी मोफत लसीकरणाबाबतची सूचना काँग्रेस नेत्यांना दिली होती.