एका वर्षात कॉंग्रेसने तीन माजी मुख्यमंत्री गमावलेत…

गुलाम नबी आझाद
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून कॉंग्रेस आपले गतवैभव प्राप्त करण्यासाठी रस्त्यावर उतरू पाहत असतानाच कॉंग्रेसला खिंडार पडले आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

या वर्षभरात अनेक जेष्ठ नेत्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यापैकी तीन नेते माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

पंजाब – अमरिंदर सिंह

अमरिंदरसिंग यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली ती 80 च्या दशकात. त्याकाळात पंजाबात अकाली दलाचा बोलबाला चालायचा. यावर तोडगा काढायचा म्हणून राजीव गांधींनी शीख चेहार पुढे आणायचा ठरवले होते.

अमरिंदर यांनी काँग्रेस जॉईन करताच 80 ची लोकसभा निवडणुकी लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात दिल्ली गाठली होती. पण 1984 मध्ये झालेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या निषेधार्थ त्यांनी लोकसभा आणि काँग्रेस दोन्हीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ते अकाली दलात सहभागी झाले होते. पुढे त्यांनी राज्यसभेची निवडणूक लढवली. लोकसभा, राज्यसभा लढविल्यांनंतर त्यांनी पंजाब सरकारमध्ये कृषी अणि वनमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होता.

पंजाब सरकारमध्ये मंत्री राहिल्यानंतरही त्यांनी अकाली दलाशी फारकत घेतली. काँग्रेस सोडून अकाली दल आणि अकाली दल देखील सोडल्यानंतर अमरिंदर यांना चांगला पर्याय न दिसल्याने त्यांनी 1992 साली ‘अकाली दल पी’ हा पक्ष स्थापन केला होता.

पण सहा वर्षे पक्ष चालविल्यानंतर 1998 साली त्यांनी पुन्हा काँग्रेस मध्ये जाण्याचा निर्णय घेतला.या सहा वर्षांत त्यांना फारसं यश मिळवता न आल्याने त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता.

1998 साली पक्षात आल्यानंतर काँग्रेस हायकमांडने पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकत पंजाब काँग्रेसचे अध्यक्षपद दिले. 1999 ते 2002 प्रदेशाध्यक्ष राहिल्यानंतर २००२ साली अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते.

2002 ते 2007 पर्यंत मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर 2010 ते 2013 पर्यंत ते पुन्हा पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2014 पुन्हा ते लोकसभेवर गेले होते. त्यांनी भाजपच्या अरुण जेटली यांचा पराभव केला होता. पुढे अरुण जेटली मोदींच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री झाले.

पुढे 2017 च्या पंजाब निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, 27 नोव्हेंबर 2015 रोजी अमरिंदर सिंग यांना पुन्हा एकदा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची कमान सोपवण्यात आली होती.

2017 ला पंजाबात काँग्रेस घवघवीत यश मिळवू शकली, याचे श्रेय अमरिंदरसिंग यांनाचं दिले जाते. 2017 च्या निवडणूकित 2007 ते 2017 अशी दहा वर्षे सत्तेत असणाऱ्या अकाली दलाचा काँग्रेसने धुव्वा उडाला होता.

2017 मध्ये काँग्रेसने अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका जिंकल्यामुळेचं त्यांना मुख्यमंत्री करणयात आले होते. 16 मार्च 2017 रोजी कॅप्टनने पंजाबचे 26 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

मात्र, नवज्योतसिंग सिद्धू यांना कॉंग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांनाही कॉंग्रेसने राजीनामा द्यायला लावला. त्यामुळे अमरिंदरसिंग यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

पंजाब लोक कॉंग्रेस नामक पक्ष स्थापन करत त्यांनी भाजपसोबत युतीन केली व विधानसभा निवडणूक लढवली खरी ; पण आम आदमी पार्टीच्या झंझावातापुढे कोणाचाच पंजाबमध्ये निभाव लागला नाही.

गोवा – लुईझिन्हो फालेरो

सप्टेंबर 2021 मध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गोव्यातील दिग्गज नेत्यांपैकी एक, फालेरो हे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नावेलीमचे आमदार होते.

2013 पासून लुईझिन्हो फालेरो हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. मणिपूर, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि त्रिपुरा या 7 ईशान्येकडील राज्यांचे प्रभारी होते.

गोव्याचे आठवे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पहिले. संघटनात्मक पातळीवर त्यांनी कॉंग्रेससाठी धोरणात्मक कामात झोकून दिले होते. मिझोराम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये सरकारे स्थापन करण्यासाठी धोरणे आखण्याचे आणि युती करण्याचे जबाबदारी फालेरो यांनी पार पाडली होती.

मात्र, त्यांनी कॉंग्रेसच्या वाईट काळात तृणमूलची वाट पकडली.

जम्मू काश्मीर – गुलाम नबी आझाद

संघटनात्मक पातळीवर आझाद यांनी आपली छाप सोडलेली आहे. 1973 मध्ये भालेसा येथील ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून त्यांनी कॉंग्रेसचे काम सुरु केले होते. पुढे त्यांनी जम्मू आणि काश्मीर प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पहिले.

1980 मध्ये अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. या माध्यामतून त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. 1980 पासून संसदीय राजकारणात असलेल्या गुलाम नबी आझाद यांची केंद्रीय मंत्री, जम्मूचे मुख्यमंत्री ते राज्यसभा विरोधीपक्ष नेते अशी कारकीर्द राहिलेली आहे.

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने ते जास्तच नाराज झाल्याचे बोलले होते. अखेर त्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपासून ते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर नाराज होते. सोनिया गांधी यांना पत्र लिहित कॉंग्रेसमधील नेत्यांसह राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

अधिक वाचा :

G -23 गटातील पहिला राजीनामा ; आता गांधींना ‘कॉंग्रेस जोडो अभियान’ गरजेचे


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *