Sunday, September 25, 2022
HomeZP ते मंत्रालयलोकसभा निवडणुकीवेळी खोतकरांनी दानवेंना घाईला आणलं, नेमका वाद का सुरु झालेला ?

लोकसभा निवडणुकीवेळी खोतकरांनी दानवेंना घाईला आणलं, नेमका वाद का सुरु झालेला ?

शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. त्यामुळे कयास लावला जातोय की, दानवे-खोतकर वाद मिटला असून दोघांची दिलजमाई झाली आहे.

यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

दानवे म्हणाले, अर्जुन खोतकर आणि मला एकत्र बसवलं होतं. त्यांना मागचं विसरून जा असं सांगितलं. पुन्हा एकत्र काम करा असंही सांगितले. मीही मान्य केलं आणि खोतकरांनीही मान्य केलं.

खोतकर आणि दानवे यांच्यातील वाद महाराष्ट्राला परिचित आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर हा वाद मिटल्याचे दानवेंनी सांगितले आहे.

पण दोघांमध्ये नेमका वाद का सुरु ?

२०१६ मध्ये अर्जुन खोतकर हे फडणविसांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट झाले. त्यांच्यावर वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.

२०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी युती धर्म पाळला नाही. विरोधकांसोबत युती करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. याचे कारण खोतकर यांना आपले बंधु अनिरुद्ध यांना जालना जिल्हा परिषद अध्यक्ष पदी बसवायचे होते.

यामुळेच खोतकर-दानवे हा वाद सुरु झाला. स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे सुरु झालेला हा वाद पुढे राज्य पातळीवर जाऊन पोहोचला. बघता-बघता २०१९ ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी खोतकर-दानवे वाद अख्या महाराष्ट्राला पाहायला मिळाला.

खोतकरांची लोकसभेत जाण्याची तयारी

निवडणुकीची तयारी म्हणून खोतकरांनी कार्यकर्त्यांचे मेळावे, बुथनिहाय बैठक घेतेल्या होत्या. कुस्ती स्पर्धांचे आयोजन. भीम फेस्टीव्हल आणि पशु प्रदर्शन अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून खोतकर जनतेशी जोडले जात होते.

लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती होण्यापूर्वी शिवसेना स्वबळाची भाषा बोलत होती. त्यामुळे युती नाही झाली, तर खोतकर विरुद्ध दानवे अशी लढाई अटळ होती.

माघार

अमित शाह मातोश्रीवर आले व शिवसेना-भाजपने युती करत लोकसभा निवडणूक एकत्रित लढविण्याचे ठरविले. मात्र, अर्जुन खोतकर यांनी युती धर्म न पाळता रावसाहेब दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करत मैदानात उडी घेतली.

आघाड्यांच्या, युतीच्या राजकारणात कुरघोडीचे राजकारण नवे नाही. खोतकर देखील दानवेंची अशीच कोंडी करतायत, असा प्राथमिक अंदाज त्यावेळी व्यक्त केला जात होता.

मात्र, जसजशी निवडणूक जवळ आली तसेतसे खोतकर दानवेंविरोधात अधिकच आक्रमक झाले. त्यामुळे जालन्यातील जागेवरून खोतकर-दानवे वादामुळे युतीत सर्व काही आलबेल नसल्याचा संदेश राज्यभर गेला.

म्हणून उद्धव ठाकरे यांना अर्जुन खोतकर यांची समजूत काढावी लागली. त्यानंतर अर्जुन खोतकर शांत झाले व त्यांनी लोकसभा निवडणुकीत माघार घेत दानवेंना पाठींबा देऊ केला. आणि सौहार्दाची भूमिका घेतली.

कुरघोडी

लोकसभा निवडणुकीवेळी खोतकरांनी दानवेंना घाईला आणले, याचा वचपा त्यांनी विधानसभा निवडणुकीत काढल्याचे बोलले जाते. लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊन दानवेंना पाठींबा दिला, पण खोतकारांनी दानवेंना मनापासून सहकार्य केले नसल्याचे बोलले जाते.

पुढे सहाच महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांचा पराभव केला. अटीतटीचीच्या या लढाईत गोरंट्याल वरचढ ठरले. मात्र, रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांच्या पारंपारिक विरोधक असणाऱ्या गोरंट्याल यांना ताकद दिली असल्याची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा असते.

खोतकर ईडीच्या रडारवर, त्यामागे दानवेंचा हात ?

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खोतकर यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. यासंबंधी सोमैय्या यांनी ईडी आणि आयकर विभागाकडे तक्रार केली होती.

तसेच ते कारखान्याची १ लाख कोटींची जवळपास २५० एकर जमीन बळकाविण्याच्या प्रयत्नात आहेत असा सनसनाटी आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

त्यानंतर खोताकारांनी सोमय्या आणि रावसाहेब दानवे यांच्या भेटीचे फोटो दाखवत लगेचच दाववेंच्या सांगण्यावरुन आणि सोमय्यांच्या तक्रारीनंतर ईडीचे छापे पडल्याचा आरोप केला होता.

अधिक वाचा :

मतदारसंघातून गायब असतात, पण दरवर्षी राख्या पाठवितात ; भावना गवळींचा ‘यवतमाळ – वाशिम पॅटर्न’

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments