कोरोनाला आळा घालण्यासाठी ठोस पावले; खबरदारी म्हणून मुंबईत मिशन टेस्टिंग.

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : राज्यसरकाराचा अग्रेसिव्ह व्हॅक्सिनेशन करून घेण्याचा मानस आहे. रोज तीन लाख व्हॅक्सिनेशन करण्यात येणार असून या सगळ्यावर मी कटाक्षाने लक्ष ठेऊन असेल असं काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. राज्यात कोरोनाचा उद्रेक झालाय त्यामुळे आठवड्याला २० लाखापेक्षा जास्त व्हॅक्सिनेशनचे डोसेस राज्यसरकारला देण्यात यावेत अशी मागणी केंद्राकडे केली असल्याचंही काल टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही ठोस पावलं उचलण्यात आली आहेत. मुंबईत आता मिशन टेस्टिंग राबवलं जाणार आहे. मुंबईतील २५ प्रमुख मॉल मध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पॅलेडियम, फिनीक्स, रुणवाल, इन्फिनीटी, इनॉर्बिट यांसारख्या मोठ्या मॉलमध्ये दररोज हजारोंच्या संख्येनं लोक येतात. विक एन्डला मुंबईतील सर्व मॉलमध्ये लाखो लोकांची गर्दी होते. मोठ्या मॉलमध्ये प्रवेशासाठी अँटीजन चाचणी बंधनकारक केल्यास आपोआप गर्दीला आळा बसेल.

तसेच मुंबईतील बाहेरगावच्या रेल्वे येणारे ७ मुख्य रेल्वे स्थानकं त्यात वांद्रे, दादर बॉम्बे सेंट्रल, सीएसएमटी, कुर्ला, अंधेरी, बोरिवली या स्थानकांवर दर दिवसाला प्रत्येकी  किमान १००० प्रवाशांच्या चाचण्या होणार आहेत. विशेषत: विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाचं विशेष लक्ष असेल असं सांगण्यात आलंय.

खाजगी हॉस्पिटलमध्ये दरदिवसाला किमान १ हजार लसीकरण करण्याची सक्ती करण्यात येणार आहे. सध्या सरासरी ४५ हजार लोकांचे मुंबईत दररोज लसीकरण होतेय. यांपैकी केवळ ५ हजार लोकांचे लसीकरण खाजगी हॉस्पिटलमध्ये होतेय. लसीकरणाची अपेक्षित संख्या गाठता आली नाही आणि सोबतच नियमाप्रमाणे योग्य सुविधा नसतील तर खाजगी हॉस्पिटलचे लसीकरण करण्याचे अधिकार प्रशासन काढून टाकणार आहे.त्यामुळे, खाजगी लसीकरण केंद्रांना प्रशासनानं लसीकरण बुथ वाढवण्याच्या, योग्य सुविधा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईतील मुख्य बस स्थानक दादर , परळ येथे दररोज १००० प्रवाशांच्या चाचण्या होणार आहेत.  मुंबईत दिवसाला ५० हजार टेस्ट करण्याचं प्रशासनाचं लक्ष्य आहे. सध्या २० ते २३ हजार टेस्ट दिवसाला होत आहेत.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *