संपूर्ण लॉकडाऊन करा अन्यथा आम्ही दुकाने उघडू; व्यापाऱ्यांचा राज्य सरकारला इशारा

पुणे: राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यात लॉकडाऊन लावण्याचे संकेत सरकार तर्फे देण्यात आले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच नागरिकांनी लॉकडाऊनची मानसिकता ठेवावी असे सांगितले होते. तर काही दिवसापासून राज्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहेत. यात पुण्यातील व्यापाऱ्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जर सरकारने लवकर लॉकडाऊन केला नाही तर आम्ही दुकाने उघडू अस इशारा दिला आहे.
राज्यात संपूर्ण लॉकडाऊन झाला तर त्याला व्यापारी पाठिंबा देतील. मात्र, संपूर्ण लॉकडाऊन नसले तर आम्ही बुधवार पासून दुकाने उघडू अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. त्यामुळे आता उद्या पर्यंत तरी सर्व दुकाने बंद राहणार आहे.
गेल्या आठवड्यात वीकेंड लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला होता. तेव्हा त्यांनी कुठल्याही परिस्थितीत दुकाने सुरू करणार असे सांगत विरोध प्रदर्शन केले होते. तेव्हा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दुकाने सुरू केल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. आंदोलन करणाऱ्या ५० ते ६० व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता प्रशासन विरुद्ध व्यापारी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.