भारतीय कोरोना लस निर्मात्यांच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालीवर चीनचा सायबर हल्ला

नवी दिल्ली: कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या दोन कंपन्यांना चीन समर्थीत हॅकर्सकडून लक्ष्य करण्यात आले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थे मार्फत Cyfirma या सायबर इंटेलिजेंस फर्मचा हवाला देत भारताच्या कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये वापरल्या जाणाऱ्या दोन लसींच्या आयटी प्रणालीवर हा सायबर हल्ला झाल्याचे म्हटले आहे.
स्टोन पांडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या APT10 या चीनी हॅकर ग्रुपने गेल्या आठवड्यात भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या माहिती प्रणाली आणि सप्लाय चेन सॉफ्टवेअर मधील त्रुटींचा गैरफायदा घेऊन हा हल्ला केल्याचे सिंगापूर आणि टोकियो येथील Cyfirma ने म्हटले आहे.
भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ने तयार केलेल्या कोरोना लसीचे अनेक देशांमध्ये सद्भावनेच्या तसेच व्यावसायिक तत्वावर निर्यात सुरु आहे. मायक्रोसॉफ्टच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबर मध्ये रशिया आणि उत्तर कोरिया स्थित हॅकर्सकडून भारत, कॅनडा, फ्रान्स, दक्षिण कोरिया कंपन्यांना लक्ष्य केले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.
विशेषकरून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या बाबतीत, हॅकर्सकडून कमकुवत सर्व्हर्सना लक्ष्य केले जात आहे. भारतीय लस निर्मात्यांच्या बौद्धिक संपत्तीचे उल्लंघन करण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला असल्याचे Cyfirma च्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार रितेश यांनी नमूद केले.