हॅकिंगच्या आरोपांवरून चीनने हात झटकले

नवी दिल्ली: भारतातील सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कोरोना लस बनवणाऱ्या कंपन्यांवर एका चीनी हॅकर ग्रुपने गेल्या आठवड्यात सायबर हल्ला केला होता. त्यावर आम्ही चोरून मिळवलेल्या माहितीवर अवलंबून नाही, असे सांगत चीनी दूतावासाच्या प्रवक्त्यांनी ट्वीट करून या आरोपांना फेटाळून लावले आहे.
“सायबर हल्ले अत्यंत किचकट आणि संवेदनशील असल्यामुळे त्यांचा मागोवा घेणे अत्यंत कठीण असते. कोणत्याही पुराव्याखेरीज एका पक्षावर असे आरोप करणे बेजबाबदारपणाचे ठरेल. आमच्यावर झालेले आरोप अफवांवर अवलंबून असून सायबर हल्ल्यांच्या बाबतीत बनावटपणाचा काहीही संबंध नाही”, असे या ट्वीट मध्ये नमूद करण्यात आले आहे.
चीनने एका हॅकर ग्रुपच्या सहाय्याने भारतीय कोरोना लस बनवणाऱ्या कंपन्यांना लक्ष्य केल्याच्या आरोपावरून या ट्वीटमध्ये चीनी दूतावासांच्या प्रवक्त्यांनी पुढे म्हटले की, “हॅकर्सच्या सहाय्याने इतर देशांच्या कोरोना लसीची माहिती चोरण्याचा आरोप आमच्यावर होत आहे. अशा अनैतिक पद्धतींवर आमचा विश्वास नाही. कोरोनावर लस बनवण्यामध्ये आम्ही आघाडीवर आहोत. आम्ही चोरून मिळवलेल्या माहितीवर अवलंबून नाही. सायबर सुरक्षा राखण्यासाठी आणि त्यासाठी इतर घटक पक्षांसोबत सहकार्य करून सायबर स्पेस सुरक्षित करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
रॉयटर्स या वृत्तसंस्थे मार्फत Cyfirma या सायबर इंटेलिजेंस फर्मचा हवाला देत भारताच्या कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये वापरल्या जाणाऱ्या दोन लसींच्या आयटी प्रणालीवर हा सायबर हल्ला झाल्याचे म्हटले होते. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या माहिती प्रणाली आणि सप्लाय चेन सॉफ्टवेअर मधील त्रुटींचा गैरफायदा घेऊन स्टोन पांडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या APT10 या चीनी हॅकर ग्रुपने हा हल्ला झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच माध्यमांमध्ये एकच खळबळ उडाली होती.