मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद; लॉकडाऊनची करणार घोषणा?

पुणे : राज्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंतावाढविणारी आहे. तर काही जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र पुणे, मुंबई शहरात लॉकडाऊनला विरोध करण्यात येत आहे. यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाऊनसाठी तयार राहावे अशा सुचना दिल्या होत्या. महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्षाचा मात्र लॉकडाऊनला विरोध आहे.
पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक उपाययोजना आणि स्थानिक पातळीवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत.
पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ संचारबंदी असणार आहे. तर दिवसा जमावबंदी असणार आहे. यावेळेत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. पुढील ७ दिवस हॉटेल, बार रेस्टॉरंट आणि सिनेमा हॉल बंद राहणार आहेत. तसेच पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणारी PMPL बससेवा बंद राहणार आहे. ३० एप्रिल पर्यंत पुण्यातील शाळा बंद राहणार.
या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ, दोन्ही मनपा पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीण एसपी, वैद्यकीय अधिकारी, दोन्ही मनपा महापौर, वैद्यकीय अधिकारी, खासदार, आमदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. त्याआधी आज दुपारी ४.३० वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर कोरोना संदर्भात आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचंही समजतंय. आज बैठकीत ठरवले गेलेले निर्बंध उद्यापासून लागू करण्यात आले आहेत. दरम्यान आता मुख्यमंत्री कोणती मोठी घोषणा करणार आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.