मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्याचं पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने १४ एप्रिल २०२१ रोजीच्या रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे २०२१ पर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यासोबतच इतरही कठोर निर्बंध लागू केले आहेत. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी इतर राज्यांतून ऑक्सिजनचा होणारा पुरवठा त्वरित व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे.
राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवणाऱ्या समस्यांच्या संदर्भात केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि सहकार्य मिळावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. आपल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, आपल्याला माहिती आहे की सप्टेंबर २०२० मध्ये संपूर्ण देशभरात एकूण १०.५ लाख सक्रिय रुग्ण होते. मात्र, सध्या उद्भवलेल्या परिस्थितीचा अंदाज घेता आणि राज्यात पारदर्शक पद्धतीने चाचण्यांच्या आधारे महाराष्ट्रात सध्याच्या वाढीनुसार ३० एप्रिल २०२१ पर्यंत ११.९ लाख बाधितांची नोंद होऊ शकते. सध्यस्थितीत महाराष्ट्रात ५.६४ लाख सक्रिय रुग्ण आहेत. मागील वर्षी सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण ८८ टक्क्यांनी अधिक आहे.
आम्ही राज्यातील स्थिती पाहता केंद्र सरकारला पुढील परिस्थितीसंदर्भातील अंदाज सांगितला आहे. राज्यातील सर्वात मोठी चिंता म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा आहे. राज्यात वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी १२०० मेट्रिक टनचा टप्पा ओलांडत आहे. एप्रिल अखेरीस ही मागणी दररोज २००० मेट्रिक टन इतकी वाढण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने मदत केल्याने आम्ही आभारी आहोत. जवळच्या राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा त्वरित व्हावा यासाठी आम्ही टॅंकर्सची तयारी ठेवली आहे. मात्र, काही दूरच्या ठिकाणांहून ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे आणि त्यासाठी वेळही लागणार आहे. त्यामुळे मी दूरच्या ठिकाणांहून एअरलिफ्टच्या माध्यमातून पुरवठा करण्याच्या पर्यायाचा विचार करावा.
मुख्यमंत्र्यांनी पत्रात पुढे लिहिलं, आणखी एक विनंती म्हणजे कोविड-१९ बाधितांसाठी उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेच्या संदर्भात आहे शिवाय भारत सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला त्याचे मी स्वागत करतो. तसेच, कोव्हिड संसर्गामुळे लहान व्यापारी व उद्योग अडचणीत आहेत त्यामुळे मार्च एप्रिलची जीएसटी परताव्याची मुदत आणखी ३ महिने वाढवून मिळावी, अशी मागणीदेखील मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली आहे.