राज ठाकरेंच्या पत्राची केंद्राकडून दखल, पंतप्रधानांचे मानले आभार !

मुंबई : देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाबाबत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रही याला अपवाद नाही. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत कोरोनाबाबत काही मागण्या केल्या होत्या. त्यातील एक मागणी केंद्र सरकारने मान्य केली आणि याबाबतच ट्वीट करत राज यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
‘१०० टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की,’ असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.
राज ठाकरे यांनी नेमक्या कोणत्या मागण्या केल्या होत्या?
- राज ठाकरे यांनी कोरोना लसी आणि इतर सुविधा यांबाबत पंतप्रधान मोदी यांच्याकडे ५ मागण्या केल्या होत्या.
- महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करण्याची परवानगी द्यावी
- राज्यातील इतर खासगी संस्थांना लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी
- लसीचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी हॉफकिन्स आणि हिंदुस्थान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी
- राज्याला प्राणवायू आणि रेमडेसिवीर यांचा आवश्यक पुरवठा करता यावा म्हणून मोकळीक द्यावी अशीही विनंती
- सिरमला महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लस विकण्याची परवानगी द्यावी
मोदी सरकारने काय निर्णय घेतला?
हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.