केंद्र सरकारने तपास करावा..,तर फटाक्याची माळ लागेल- राज ठाकरे
सचिन वाझे हे मुख्यमंत्र्याचा अत्यंत जवळचे आहे
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांच्या लेटर बॉम्ब नंतर या प्रकरणात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी हे सर्व प्रकरण केंद्र सरकारने हाताळावे अशी सुद्धा मागणी केली आहे.
राज ठाकरे म्हणाले,
सचिन वाझे हे मुख्यमंत्र्याचा अत्यंत जवळचे आहे. त्यांना शिवसेनेत कोणी आणलं याची सुद्धा माहिती मिळायला हवी. सचिन वाझे यांना 14 वर्षानंतर पोलीस दलात पुन्हा घ्यावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केल्याचे देवेंद्र फडणीस यांनी स्वतः सांगितले. याचा अर्थ असा निघतो की सचिन वाझे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आहेत.
मुकेश अंबानी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मधुर संबंध आहेत. त्यांच्या शपथ विधीला अंबानी आपल्या परिवारासहित उपस्थित होते. मग वाझे यांना कोणी सांगितल्याशिवाय मुकेश अंबानी यांच्या घराखाली स्फोटके ठेवणार आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
पूर्वी आतंकवादी स्फोटके ठेवत होते आता पोलीसच ठेवत आहेत. हे पहिल्यांदाच झाल आहे. हे धक्कादायक आहे पोलिसांना कोणाच्या सूचना आल्या शिवाय हे होणार नाही असेही ते म्हणाले.
हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. यात फक्त पोलीस दलातील वाद आहेत अस नाही म्हणता येणार. हा गंभीर प्रश्न आहे.
त्यामुळे केंद्राने यात हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र सरकार यात योग्य चौकशी करणार नसल्याने केंद्र सरकारने तपास करावा. या प्रकरणाची चौकशी केली तर फटाक्याची माळ लागेल. अनेक अनाकलनीय चेहरे समोर येतील.
याच बरोबर कोण – कोण आत जातील याची कल्पनाही कोणाला करता येणार नाही.
परमवीर सिह जर दोषी होते तर त्यांना निलंबित का करण्यात आले नाही? त्यांची चौकशी का करण्यात आली नाही? त्यांची बदली का करण्यात आली?मूळ विषय हा मुकेश अंबानी यांच्या घरासमोर कोणी स्फोटके ठेवली हा आहे तो विषय इतरत्र वळवू नये असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे:-
अंबानींच्या घराबाहेर बॉम्बची गाडी सापडते आणि ती गाडी पोलिसांनी ठेवली असा आरोप आहे, मुळात अशी घटना कुण्या वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकते का? त्यामुळे ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली ह्याचा तपास करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा.
• ह्या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण जशी चौकशी पुढे जाईल तशी फटक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील.
• जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं, त्या पोलीस दलाचा बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगण्यासाठी वापर होतो हे भयंकर आहे. ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायलाच हवा. आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी.
• माझी केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी कारण ह्या प्रकरणाचा राज्यात निष्पक्ष तपास होईल ह्याची मला अजिबात खात्री नाही. जर केंद्राने पण नीट चौकशी नाही केली तर मात्र जनतेचा सरकारवरचा विश्वास कायमचा उडेल आणि आपण अराजकाच्या दिशेने जाऊ.
• सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा हे राजकीय मुद्दे आहेत.ह्यात आत्ता नको पडूया. ह्याची चौकशी व्यवस्थित होऊद्या. कारण चौकशी व्यवस्थित झाली नाही तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील.पोलिसांना हे कृत्य आणि इतका अतिरेकी विचार करायला लावणारे कोण हे आधी कळू द्या!