सीबीआयने अनिल देखमुख यांना विचारले ‘हे’ प्रश्न; केली अकरा तास चौकशी

मुंबई : १०० कोटी रुपयांची वसुलीच्या आरोप प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तब्बल ११ तास चौकशी केली. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत.
सीबीआयने अनिल देशमुख यांना विचारले हे प्रश्न
- सीबीआयने चौकशीवेळी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलेल्या आरोपा बद्दल देशमुख यांना विचारणा केली.
- निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना वसुलीचे टार्गेट दिले होते का? त्याशिवाय इतर कोणाला टार्गेट दिले होते का
- याबाबत तुमच्यावर कोणाचा दबाव होता का?
- कोणकोणते अधिकारी ब्रिफिंगसाठी येत होते, त्यासाठी काय प्रोटोकॉल होता
- सचिन वाझे यांनाच का बोलवण्यात येत होते अनिल देशमुख यांना चौकशी दरम्यान साधारण ४० प्रश्न विचारण्यात आले. सीबीआय हा अहवाल सोमवारी उच्च न्यायालयात सादर करणार आहे.
अनिल देशमुख यांनी यापूर्वीच त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
काय आहे प्रकरण
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते असा आरोप केला होता.