एकनाथ शिंदे दसरा मेळाव्याची ‘परंपरा’ चालवू शकतील का?

एकनाथ शिंदे
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..


जुलै महिन्यात शिवसेनेत फूट पडली आणि ४० आमदारांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेच्या हाती नेतृत्व सोपवलं. त्यामुळे शिवसेनेचे २ गट पडले ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना. भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे मुख्यमंत्री झाले आणि शिंदेनी शिवसेना या पक्षावर आपला दावा सांगितला.

सध्या शिवसेना कोणाची हे प्रकरण निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. दसरा मेळाव्यासाठी देखील दोन्ही गटांकडून शिवाजी पार्क हे मेळाव्याचे पारंपरिक ठिकाण आपल्याला मिळावे या साठी जोरदार तयारी केली गेली. सुप्रीम कोर्टाच्या मध्यस्थीने मैदानाचा प्रश्न निकाली लागला. सुप्रीम कोर्टाने ठाकरेंना या मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी दिली. त्यामुळे शिंदे गटाने बीकेसी मैदानावर आपल्या दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे.

शिवसेनेने दसरा मेळावा का सुरु केला होता:

बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना करून जवळपास वर्षभराचा कालावधी उलटून गेला होता या दरम्यान बाळासाहेबांचा जनतेशी असलेला संवाद कमी झाला होता या मुळेच १९६६ साली शिवसैनिकांचा मेळावा घेण्याचा विचार झाला अन दिवस ठरला.

दसऱ्यादिवशी दादरच्या शिवाजी पार्कात मेळावा आयोजित केला गेला आणि शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरु झाली. हा पहिला वाहिला दसरा मेळावा संध्याकाळी पाच वाजता नियोजित केलेला होता. मुंबई शहरातील वेगवेगळ्या भागातून येत कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच पार्कवर गर्दी केली होती.

आपला पहिला दसरा मेळावा अगदी जंगी व्हावा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. पण कार्यक्रमाला गर्दी होईल, का प्रश्न उभा होता. एवढा अट्टाहास करून सभा भरवतोय म्हटल्यावर गर्दी दिसायला पाहिजे, असं बाळाहेबांना वाटायचं.

पण शिवाजी पार्क अवाढव्य आहे. गर्दी नाही जमली तर पांढरा माळ होईल, त्याचा शिवसेनवर परिणाम होईल, याची जाणीव बाळासाहेबांना होती. म्हणून त्यांनी पार्कच्या अगदी मधोमध व्यासपीठ उभारले होते. व्यासपीठासमोरील थोड्या जागेत लोक जमल्यामुळे त्याला गर्दीचे स्वरूप येणार होते.

दसऱ्या दिवशी शिवाजी पार्ककडे लोकं खेचली जावीत, म्हणून कसरतींचे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात शाहीर साबळे यांनी ‘महाराष्ट्र गीत’ गायला सुरुवात केल्याने बघता बघता गर्दी वाढली होती.या व्यासपीठावर प्रबोधनकार ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांच्यासोबत रामराव आदिक, बळवंत मंत्री आणि प्रा. स. अ. रानडे हे देखील उपस्थित होते.

जेंव्हा बाळासाहेब भाषण करायला उभारले तेंव्हा त्यांनी ‘महाराष्ट्राला आज खरी गरज महाराष्ट्रवादाची आहे’, असं म्हंटल आणि त्याक्षणी सभा जिंकली. बाळासाहेबांच्या या वाक्यानंतर प्रचंड टाळ्यांचा कडकडात झाला होता.

या नंतरच्या काळात शिवसैनिकांसाठी बाळासाहेबांचे दसरा मेळाव्यातील भाषण हे बुस्टर डोस प्रमाणे असायचे त्यामुळे शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या गर्दीने शिवाजी पार्क फुलून जायचे. अत्यंत जहाल आणि कडवट भाषेत बाळासाहेब तत्कालीन राज्यकर्त्यांचे जाहीर वाभाडे काढत त्यावेळी शिवसैनिकांच्या घोषणांनी शिवाजी पार्कचा परिसर दुमदुमून जात असे. याच शिवाजीपार्कातून बाळासाहेबांनी पहिल्यांदा जाहीर व्यासपीठावरून हिंदुत्वाची हाक दिली होती.

पुढे २०१२ साली पहिल्यांदाच दसरा मेळाव्यासाठी बाळासाहेब व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. प्रकृतीच्या कारणास्तव बाळासाहेबांना शिवाजी पार्कवर उपस्थित राहता आले नव्हते. या वेळी पहिल्यांदाच नेहमी कणखर आणि कडवट भूमिका घेणाऱ्या बाळासाहेबांना शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्राने मवाळ भूमिकेत पाहिलं.

आपल्या शेवटच्या मेळाव्यात त्यांनी ‘जसं मला सांभाळलंत तसेच उद्धव आणि आदित्यला सांभाळा’ हे आवाहन शिवसैनिकांच्या हृदयात घर करून गेलं. त्यामुळे बाळासाहेबानंतरही शिवसेना आणि दसरा मेळावा हे समीकरण कायम राहिले.

पहिल्यांदाच ठाकरें शिवाय मेळावा होणार

मात्र, २०१९ साली उद्धव ठाकरेंनी आपला पारंपरिक मित्र असलेल्या भाजपाची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केलं,मात्र दोन महिण्यापुर्वी शिवसेनेत बंड झाले अन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले.

भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि बाळासाहेबांच्या वैचारिक विचारांचे आपणच वारसदार आहोत त्यामुळे बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी दसरा मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले होते आणि त्यानुसार शिंदेचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे.

ज्या प्रमाणे बाळासाहेब ठाकरे आपल्या विरोधकांबरोबरच पारंपरिक मित्र असणाऱ्या भाजपच्य चुकीच्या निर्णयांवर तोंडसुख घेत असत. त्याप्रमाणे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले शिंदे कणखर भूमिका घेऊ शकतील का? त्याचबरोबर सध्या माध्यमातून गाजत असलेला विषय म्हणजे प्रत्येक मंत्र्यावर शिंदेनी आपापल्या मतदारसंघातून कार्यकर्त्यांना आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सध्या बहुतांश आमदार शिंदेंच्या बाजूने असल्याने कार्यकर्ते जमविने हि मोठी गोष्ट नाही परंतु भविष्यात शिंदे जेव्हा सत्तेतून बाहेर जातील तेव्हा आमदारांच्या जीवावर होणारा दसरा मेळावा यशस्वी होऊ शकेल का हाच खरा प्रश्न आहे?


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *