पुस्तक परिचय: पटेली

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

शहारलेल्या जमिनीच्या स्पर्शाने गळून पडणारी पटेली.. वेगातला वगळ जाणवल्याने आक्रसलेली पटेली.. उभारण्या अगोदरच जमीनदोस्त होणाऱ्या स्वप्नांना आजचे ताण पेलत नाही हे ठणकावून सांगणारी पटेली.. कप्पे नाकारून ‘आजचं’ काही बोलू पाहणारे ‘अविनाश उषा वसंत’ पटेलीतून नव्या भानांचे अवकाश उलगडू पाहतात. मुंबईशी अगदीच पुसटसा संबंध आलेला वाचक म्हणून कादंबरी समजताना कसरत होणे स्वाभाविकच, पण २४ जानेवारीच्या संध्याकाळी पत्रकार भवन पुणे येथे झालेल्या पटेलीच्या प्रकाशन आणि परिसंवाद कार्यक्रमामुळे ‘वाचक’ म्हणून निश्चितच एक पाया तयार झाला. तरुण पिढीची प्रतिनिधी म्हणून मैथिली ढोके पटेलीच्या ‘संहिता आणि अन्वयावर’ बोलत असताना, कादंबरीतील तरुण पात्रांच्या संवादातून, जीवनशैलीतून, सामाज माध्यमांच्या वापरावरून आत्मप्रत्यय येतो असे नमूद करते. यातूनच ही संहिता आजच्या तारखेची भाषा बोलते,ती विनाकारण जटील न होता, बम्बइया मराठी, कधी सहज हिंदी तर कधी भांडवलाची इंग्रजीही बोलते. टाईपणे, पोस्टणे सारख्या क्रियापदांचं सामन्यीकरण होण्याचा हा काळ आहे. त्यामुळे कोणतेही भाषिक जोखड न घेता लेखक व्यक्ती आणि तिची व्यक्तता त्याच शैलीत टिपून घेतो. कधी स्वतःची टिपण्णी करतो. कधी फेसबुक सारखेच अल्गोरीद्मिक विचार करतो. टेक्सतो. आज मनात विचार ‘बीप’ होतो. अर्धवट वाचून ‘k’ पाठवला जातो. हे नेमकेपणाने अविनाश पकडतो. ‘गझल-ऊर्जा-समुद्र’ हा व्यक्तीत्रय, त्यांची एकमेकांतली भावनिक, शारीरिक, मानसिक गुंतवणूक, प्रत्येकाची पार्श्वभूमी आणि त्या पद्धतीने स्वतंत्र आणि एकमेकांसोबत केलेली वाटचाल हा कादंबरीचा मुख्य अवकाश. परंतु, या रूढ ढाचापलीकडे मयुरेश भडसावळे यांनी मुंबईची शहर म्हणून जी ओळख करून दिली, मुंबईची निर्मिती, विकास आराखडे, गिरणी कामगारांचा संप, रियल इस्टेटचा पाशवी शिरकाव, सेना, उद्योजक, सहसंबंध आणि यातून तयार झालेल्या, एकमेकात गुंतलेल्या अनेक व्हेन आकृत्यातून नवनवे ‘ग्रे’ एरिया प्रकाशात येतात. लेखकाला या वास्तवाचे भान आहे आणि ठिकठिकाणी ‘लोअर-अप्पर’, खाण्याच्या ठिकाणांचा, दारूच्या ब्रांडचा क्रम टिपून लक्षात आणून देतो. ‘लोकल’ आणि ‘चाळ’ यांचीही प्रतवारी असू शकते? याची मुंबईबाहेरच्या माणसाला बोच लागून राहते.

बरेचदा या धुमचक्रीतून ‘टोकाचा’ नकार जन्म घेत असतो. वेदनेतून प्रसवलेल्या नकारांनी आजवर एक भूमिका मराठीत मांडली पण, जगण्याची अपरिहार्यता आणि त्यातून पुढे जाण्याची धडपड घेवून येणारी’ समंजस स्विकारशीलता’ पटेली दाखवते असे अगदीच अचूक निरीक्षक संग्राम गायकवाड मांडतात. अनेक मिती असणारी भाषाच हा सर्वकष स्वीकार दाखवते. ‘कॉमन संडासात हागण्यासारखी’ अत्यंत नित्यनियमित बाब गुप्त सहमतीने आजवर मुख्य प्रवाहातल्या साहित्याकांकडून का बर वगळली गेली असेल? असे अनेक ठिकाणी वाटत राहते.

एक घडत असताना दुसऱ्याचे हक्क मारले जाणे स्वाभाविक असायला हवे का? स्त्रीवाद सिमोनच्या फार पुढ आला असताना शहरातली चाळ ‘गावासारखीच’ उरते. तिथे ‘चव्हाण काकू’ म्हणजे ‘जात’ आणि ‘लिंग’ अशी ओळख असणारी व्यक्ती संसार सांधण्याचे, समजून घेण्याचे, समजावण्याचे काम आजही करतात. ‘हेमा’ सारख्या आईलाही ‘अनंतकाळ माता’ गिरवावे लागते. पिणाऱ्या २० जणांमध्ये निवदालाही एखादी मुलगी का बसू नये चाळीत? असा तिरका छेद घेत प्रवीण चव्हाणांनी स्त्रीवारी नजरेतून पटेली उलगडली. साचे पालट म्हणजे बदल होतो का? आणि अंतिम निकषात ‘व्यक्ती’ म्हणून हाती काय लागायला हवे? असे मुलभूत प्रश्न यामुळे पडत राहतात.

महानगरच्या विखुरलेल्या संवेदनांतून तयार झालेली ही पटेली गझल-उर्जा-समुद्र या त्रिकुटातून आपल्याला काही सूचन करू पाहते. विखंडतेतून गवसलेले काही कोणत्याही ‘टॅगशिवाय’ आपल्याला देऊ बघते. याला प्रादेशिक संदर्भाची समृद्धी असल्याने ते केवळ महानगरीय न राहता आपल्या उगममुळापाशीही ओलसर राहते असे अध्यक्षीय मत डॉ. महेंद्र कदम मांडतात.

तांत्रिकतेपासून सांस्कृतीकतेपर्यंतची मक्तेदारी आजूबाजूला दमवत असताना केलेल्या धडपडीची अनुभूती पटेली देते. माणसांचे ग्राहकीकरण होण्याचा दशकांमध्ये अतिशय वेगात तरी तुकाराम श्वासात भरत पटेली अस्वस्थ करते. उत्तर देत नाही. मोक्ष सुचवत नाही, उलट फेरमांडणीची शक्यता उजागर करते. काचा पुसून घ्यायला हव्यात त्याशिवाय पटेली नीट दिसायची नाही.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *