Monday, September 26, 2022
HomeUncategorizedकल्पना दुधाळ लिखित: 'सिझर कर म्हणतेय माती'

कल्पना दुधाळ लिखित: ‘सिझर कर म्हणतेय माती’

बहिणाबाई मातीचा टिळा कपाळाला लावायची, कल्पना त्या कपाळाच्या मातीला स्वतःची महती सिद्ध करण्यासाठी पुकारते. माळ्याच्या मळ्यात गुलाब, जाई-जुईचे ताटवे सिनेमांत बहरलेही, तिथं कल्पनाने दराअभावी कुस्करलेल्या ताटव्यांचे हिशोब मागितले. सिंचन राजकारणी झाल्यावर रक्तावर पोसलेलं पीक ‘महागाईची किंमत’ आणि ‘मातीत कुजणाऱ्यांची हिम्मत’ दाखवून देईल असा अर्थगर्भ इशारा ती देते. ती देतेय जाण खुरप्यात आणि नांगराच्या फाळात शहरी कचरा अडकला तर गुणसूत्रांतून भलतचं काहीतरी निपजेल याची. ती शहारत नाही उगाचच तर टवकारते कान ‘यंत्र’ मातीला गिळत चाललेल्याचा आवाज ऐकण्यासाठी. ती कल्पना दुधाळ. तिची ओळख, बायोडेटा काही वेगळा नव्हे – तिची कविताच तिचं आयकार्ड – ‘सिझर कर म्हणतेय माती’.

सुईण बाळंतपण करायची तेव्हा सोस फार असे. भुईला जास्त स्ट्रेचमार्क्स पडू नये म्हणून ‘सिझर’ करावं का? असा अणकुचिदार उद्गार कवीताई काढते. परदेशातलं ट्यूलिप्स साजरं दिसायचं आधी तिला पण हुरडा पार्ट्या चेकाळल्यावर कणसांचा मरणोत्सव तिला वेढून घेतो, इवलं मूठभर टचटचीत दाण्यांचं कणीस ‘मद्य’ निपजणार तेव्हा आपण कव्हरेज क्षेत्राबाहेर आहोत असं क्षणभर तिला वाटून जातं.

काटेसावरीचे काटे त्वचेतून उगवल्यावर ती निबर होते. जन्मभर चालण्याचा ‘टोल’ भरावा लागल्याचे सांगत संचित गमावल्याचे दुःख पुन्हा पुन्हा मांडत राहते. टोमॅटो वरच्या काळ्या डागांवर औषध मारताना ती औषधाचं बोट गालावरच्या वांगाला पुसते, तेव्हा हा फक्त रूपकाचा खेळ न राहता एका मोठ्या वर्गाच्या, झपाट्याने खालावत जाणाऱ्या जीवनमानावरचे बौद्धिक भाष्य ठरते.

कविता तडजोड करत नाही. ‘लँड’लाईन संपत चालल्याने आणि फुफ्फुसांत जंतूसंसर्ग बोकाळल्याने विश्‍वाचं पेस्ट कंट्रोल करायची भाषा बोलते.

ती पिढ्या तपासते. चिल्लर जमवून घेतलेल्या जमिनी फुकून खाणाऱ्या औलादी बोकाळल्याचे चिडीने नोंदवते. ती एकूण माणूसपणावर बोलायला लागते तेव्हा तिला बांडगुळं दिसतात, भिरूडं दिसतात; मग ती हसते ‘एक्सप्रेस युवरसेल्फ’ – ‘कनेक्टिंग पीपल’ वर हसते. शून्यात बघत राहते. उसन्या अवसानांना सवाल करताना, ‘पाठीचा विळा झाला, नाकातोंडात माती गेली तरी पेर्ते व्हावं?’ अशी कडाडते.

गावात सोडून गेलेल्या आई बापाचा आक्रोश तिच्या लेखणीतून क्रंदतो. शहरात वेगळं राहिलेल्या पोरा नातवंडांच्या सयीनं म्हातारीचा पदर नव्हे, पदराची चिंधी भिजते. हा हतबलतेचा स्तर टिपणारी ही कविता आहे. ‘वेड्याचं घर उन्हात असतं’ ही शहाणीव या कवितेला आहे. पुनर्वसनाचा चिमूटभर भंडारा फेकून येडा बनाने का काम करणाऱ्या व्यवस्थेला ती पुरव्यांनीशी चोपून काढते. पोरांना कॉन्व्हेंटमध्ये धाडायचं म्हणते, महानगरीय व्यवस्थेत ती उघडी पडू नयेत म्हणून. तिला काळाचा संकोच कळतो तसा नात्यांचाही कळतो.

‘कोवळं दाणं भेडं झाल्यावर

 पिठाळ होत्यात म्हणत

 मोठा पुढारी झालेल्या पुतण्याचं

 लोकांपुढं कौतुक करतो’

 असा ‘चुलता’ तिनं नीट निरखून पाहिलाय. कध्धी तोंड दावू नाय पाचटाच्या मुलुखाले. असं म्हणणारी बिनचेहऱ्याची ‘ती’ नोंदवून ठेवते. या मातीतल्या शब्दांची किंमत विचारली तर ‘नॉट फॉर सेल’ म्हणत पुढं चालू लागते. उलट्या पिसांच्या कोंबड्या आणि उलट्या काळजाची माणसं वाढत चाललीयेत दिवसाढवळ्या हे माहिती आहे तिला.

 वाट डोंगराची

 हंड्या झुंबराची

 नाही जपत

 पावलं माणसांची

असं म्हणणारी सईबाई आणि जोडीदारनी, डोक्यावर गठुडी घेऊन झपाझपा चालताना मावळत्या दिवसांशी उगवत्या पैजा लावतात. हिंमतीवर पैजा जिंकतात बाया. या शेतीप्रधान देशाच्या नुसत्या नागरिक नव्हे जिवंत पुरावेच जगतात बाया. मातीचं ‘सीझर’ करायला लागेल याचं काळाअगोदर भान आलेली ही कवयित्री – वापसा धरलेल्या वावरात नांगरांचा फाळ आणि पोटुशा शब्दांची वार पाडत राहो!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments