स्वप्निल रामदास कोलते लिखित “मुकद्दर”- पुस्तक परिचय
आपण इतिहास वाचतो म्हणजे काय करतो? आपल्या मातीतल्या लोकांनी गाजवलेले ‘पराक्रम’ आपण वाचतो. आणि मग अर्थातच महाराष्ट्रात जन्मन्याचं भाग्य लाभलेले आपण ‘शिवछत्रपतींचा’ इतिहास स्मरुन थरारतो. पण शिवाजी महाराज नक्की कोणा विरुद्ध लढले? आशिया खंडातील सर्वात सामर्थ्यशाली बलाढ्य सुलतानाविरुद्ध लढताना त्यांनी काय ‘दिव्य’ पत्करलं असेल? रायगडावर ‘मराठ्यांचे तख्त’ विराजमान झाल्यानंतर त्याच्या रक्षणासाठी शिवपुत्र संभाजी, राजाराम, ताराराणी आणि संताजी-धनाजी सारख्या असंख्य मावळ्यांनी त्या शहेनशहाला २६ वर्ष अक्षरशः झुलवत ठेवले! या संघर्षाच भान आपल्याला यावं, सर्वसामान्य मराठी रयतेला या दिल्लीश्वरांच्या महत्त्वाकांक्षेची, त्यासाठीच्या क्रूरतेची कल्पना यावी आणि त्यातून आपल्या बापजाद्यांचा हा संघर्ष किती उमदा होता हे लक्षात यावं यासाठी स्वप्नील रामदास कोलते लिखित ‘मुकद्दर’ वाचायला हवे.
ऐतिहासिक साधनांद्वारा आणि इतिहासकारांकडून जो तपशीलवार इतिहास सांगितला जातो, तो अनेकदा सामान्य जनतेला आकळत नाही. म्हणूनच अत्यंत गांभीर्याने, अभ्यासपूर्वक परंतु ‘गोष्ट रूपाने’ सांगितलेला हा इतिहास इतर ऐतिहासिक दस्ताऐवजांपेक्षा वेगळा ठरतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचायचे असेल तर ‘त्यांच्या भाषेत’ बोलावे लागते हे सूत्र लेखकाने असोशीने जपलेले आहे.
संपूर्ण साम्राज्य, डामडौल, शाही इंतजाम डावलून दख्खन जिंकायला आलेल्या चिवट औरंगजेबाने संभाजी महाराजांना क्रूरतेने मारुन मराठ्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा केलेला प्रयत्न, राजारामानंतर तरी दख्खन हाती लागेल म्हणून दिवसरात्र झुंजलेले मोगल सैन्य, आणि विधवा ताराराणीनेही धुळ चारल्यावर हतबुद्ध झालेला म्हातारा असहाय औरंगजेब! दख्खनेतल्या प्रत्येक डावपेचात नव्याने आश्चर्यचकित झालेला औरंगजेब, स्वतःच्या सैन्यातच बंडाळी माजलेली बघून निराश झालेला औरंगजेब, कित्येक वर्ष घरापासून लांब राहिलेले सैन्य केवळ आपल्या हट्टाखातर कापले गेलेले बघून उद्विग्न झालेला औरंगजेब, कपट, फरेब, चलाखी, लाच, कोंडी, लालूच अशा नानाविध चाव्या फिरवूनही मराठे का गुडघे टेकत नसावेत हे न समजल्याने हवालदील झालेला औरंगजेब! वाचताना हातांच्या मुठी वळण्याऐवजी अवाक् व्हायला होतं, हेच लेखकाचे यश. धार्मिक तेढ हे कधीच झुंजण्याचे कारण नव्हते. मध्ययुगात प्रत्येक गोष्टीला धर्मभावना चिकटवल्याशिवाय लोकमन हाकारता न आल्याने औरंगजेबाने ‘इस्लाम’ धर्माची ताकद वापरून सैन्याला बळ दिले. सपाट मैदानांची सवय असलेल्या मोगल सैन्याला दख्खन पाशवी वाटला, इथल्या पुरांनी तर कधी रखरखत्या उन्हांनी त्यांची दैना उडवली. निबिड जंगलात दबा धरुन बसलेल्या मराठ्यांचा खौफ दस्तुरखुद्द औरंगजेबाला होता, तिथं त्याच्या चतुरंग सेनेची काय कथा!
युद्ध फक्त रणांगणात होत नसते, त्याची आंदोलने अगोदर मनामध्ये कंपीत होत असतात. मराठे विरुद्ध दिल्ली सल्तनत हे असेच हुशारीचे, गनिमी काव्याचे, जमीर तपासणारे युद्ध होते. मराठ्यांच्या चार पिढ्यांनंतर उरलेला ‘औरंगजेब’ शेवटपर्यंत असमाधानी राहिला, तो का? याचं उत्तर या लढवय्या इतिहासात आहे.
आखरी जंग, बारिश और मरहट्टे, मुल्क-ए-दख्खन, बगावत, नूर आणि मुकद्दर अशा प्रकरणांतून औरंगजेबाची दख्खनस्वारी मांडताना लेखक इथली भौगोलिक वैशिष्ट्ये, निसर्ग, स्थानिक लोकांचे राहणीमान या संदर्भातले तत्कालीन बारकावे टिपतो. शिवाय मुघल-अदबी, मानमरातब, स्त्रीयांना मिळणारी वागणूक, आतून पोखरलेल्या पण अवाढव्य असणाऱ्या मुघल सल्तनतीच्या अवशेषांचेही अतिशय नेमके वर्णन पुस्तकात आढळते. ओघवत्या शैलीने वाचक त्या त्या प्रसंगांशी, अगदी औरंगजेबाच्या भावनिक आंदोलनांशीही तादात्म पावतो. आपला गुरुर असणार ‘किमाँश’ फेकून देताना थरथरणारा औरंगजेब नक्की वाचायला हवा!