बॉलिवूड कलाकारांच्या ‘व्हॅनिटी व्हॅन्स’ आता चक्क महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सेवेत !

मुंबई : कोरोना महासाथीच्या वाढत्या प्रभावामुळे सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व इतर सेवा बंद आहेत. साहजिकच चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंग देखील बंद आहेत. अशामध्ये सर्व कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅन रिकाम्या पडून आहेत. आता या व्हॅनिटी व्हॅन कोरोना योद्धांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.
सध्या आलिया भट्ट, रणवीर सिंग,अक्षय कुमार या कलाकारांच्या चित्रपटांच्या शूटिंग बंद पडल्या आहेत. त्यामुळे यांच्या व्हॅनिटी व्हॅन मोकळ्याच पडून आहेत. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार सध्या ६ व्हॅनिटी व्हॅन पोलीस कर्मचाऱ्यांना वापरण्यासाठी देण्यात आल्या आहेत. यामध्ये रणवीर सिंगची ‘सर्कस’, आलिया भट्टची ‘गंगुबाई काठडीयावाला’ आणि अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ चित्रपटांच्या व्हॅनिटी व्हॅनचासुद्धा समावेश आहे.
बॉलिवूड कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅन्स दिल्यानंतर याचे मालक केतन रावल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे, ‘मी रोहित शेट्टीच्या सर्कस, संजय लीला भन्साळीच्या गंगुबाई काठडीयावाडी आणि आनंद एल. रॉय यांच्या रक्षाबंधन या चित्रपटांच्या व्हॅनिटी व्हॅन्स मुंबई पोलिसांच्या सेवेसाठी दिल्या आहेत. ज्या महिला पोलीस कर्मचारी या कोरोनाच्या काळामध्ये सेवा देत आहेत. त्यांना आराम करण्यासाठी आणि त्यांना बाथरूमला वगैरे सोयीस्कर व्हावं म्हणून या व्हॅनिटी व्हॅन्स दिल्या आहेत. त्याचबरोबर ड्युटी संपल्यानंतर हे कर्मचारी आपले कपडे बदलून सुद्धा घरी जाऊ शकतील.
जेव्हा जेव्हा कोणतेही कठीण प्रसंग देशावर किंवा समजावर येतात तेव्हा पोलिसांची जबाबदारी आणि कष्ट वाढतात. अशावेळी सर्वात जास्त अडचण होते ती महिला पोलीस कर्मचाऱ्यांना त्यामुळे हा विचार करून केतन रावल यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावरून त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतं आहे.