भाजपच्या नेत्याचा गौप्यस्फोट ‘शरद पवारांचा पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अदृश्य हात’

जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत दिली माहिती
मुंबई : पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि सगळीकडे चर्चेला उधाण आलं. राज्याच्याच नव्हे देशाच्या राजकारणातही काही हालचाली झाल्या तरी त्यामागं शरद पवारांचा हात तर नाही अशी चर्चा सुरू होते. भाजपच्या या पराभवामागेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हात असल्याचं बोललं जाऊ लागलं. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांनीच या चर्चेची सुरुवात केल्याचं राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल रात्री एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी गौप्यस्फोट केल्याचं म्हटलंय. शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडलं. त्यामुळं मतविभागणी रोखली गेली. याचा फटका भाजपला बसला त्यामुळं पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला असं वक्तव्य कैलास विजयवर्गीय यांनी केल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. विजयवर्गीय यांच्या या वक्तव्याचा अर्थ शरद पवारांचा पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अदृश्य हात होता असंही आव्हाड यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
प.बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांचा गौप्यस्फोट..!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 2, 2021
“शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्याने मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसलाय.”
.याचा अर्थ शरद पवारांचा अदृश्य हात प. बंगालच्या निवडणुकीत होता..! pic.twitter.com/ofboPWAzlz
ममता बॅनर्जींना शरद पवारांनी पाठिंबा दर्शवला होता
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना शरद पवारांनी पाठिंबा दर्शवला होता. विशेष म्हणजे ममता बॅनर्जींच्या प्रचारासाठी शरद पवार हे पश्चिम बंगालमध्ये जाणारही होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांना प्रचाराचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. ममता बॅनर्जींनी भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याची विनंती केली होती. शरद पवारांनी त्याला सक्रिय प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता शरद पवारांनी ममता दीदींच्या विजयावर त्यांचं अभिनंदनही केलं. तसंच निकालानंतरच्या घडामोडींवर पवारांनी टीकाही केली.