भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला
राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार
मुंबई: मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्ब नंतर राजकारण ढवळून निघाले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले असल्याचे सांगितले होते. हा मुद्दा राज्यभर गाजत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. यावेळी भाजपकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात येईल.
राजभवन येथे भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेईल. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार आहे. सध्या हे शिष्टमंडळ राजभवनात पोचले आहे. यात देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील मंगलप्रभात लोढा आदींचा समावेश आहे.
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना परस्पर बंगल्यावर बोलवून त्यांना वसुलीचा टार्गेट देत असल्याचा आरोप केला होता. यानंतर विरोधीपक्ष अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत या प्रकरणात केंद्र सरकराने हस्तक्षेप करावी अशी मागणी केली होती.
शरद पवारांनी देशमुखांची केली पाठराखण
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली होती. परमबीर सिंह यांनी ज्यावेळी आरोप केले होते. त्यावेळी अनिल देशमुख हे हॉस्पिटल मध्ये भरती होते. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याचे पवार यांनी सांगितले होते.