गुजरातमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता ; बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास, कोश्यारींबद्दलही केले मोठे विधान

चंद्रशेखर बावनकुळे
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

राजकीय मैदानात सध्या गुजरात निवडणूकीची जोरदार रणधुमाळी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी कडवे आव्हान दिल्याने ही निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी प्रतिष्ठेची असल्याचे मानले जात आहे.

येत्या १ डिसेंबरला गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यामुळेच राज्यात प्रचाराच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात पुन्हा भाजपाच सत्तेत येणार असल्याचे मोठे विधान केले आहे.

माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाला १४५ पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचेही सांगितले आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांनीही गुजरातचा गड अबाधित ठेवण्यासाठी कंबर कसली आहे.

त्याचबरोबर, कॉंग्रेससोबतच आपचे अरविंद केजरीवाल यांनीही मतदारांना आकर्षित करण्यात चांगले यश मिळवले आहे. मात्र तरीही गुजरातमध्ये विरोधी पक्षच अस्तित्वात नसल्याने भाजपा १४५ च्यावर जागा मिळवणार असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केला आहे.

याबाबत माध्यमाशी बोलताना बावनकुळे यांनी “जेव्हा जेव्हा एखाद्या प्रदेशात निवडणुक लागते तेव्हा आम्ही प्रचाराला जात असतो. पक्षाच्या प्रचारासाठी कोणीही बोलावत नाही. कोणालाही बोलावावे लागत नाही.

पक्षाचा कार्यकर्ता उठतो आणि प्रचाराला जातो. ती आमची सवय आहे. तसेच गुजरातमध्ये गेल्या ४५ वर्षांपासुन भाजपाची सत्ता आहे. राज्यात कोणताही विरोधी पक्ष अस्तित्वात नाही त्यामुळेच भाजपाला १४५ च्या वर जागा मिळणार आहेत,” असा विश्वास व्यक्त केला आहे.

त्याचप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा तसेच पक्षाचे इतर सर्व नेते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानूनच काम करतात.

मोदींनी जे काही निर्णय घेतले आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा दाखला आहे. त्यामुळे राज्यपालांना केंद्र सरकार कसा पाठिंबा देईल. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतली आहे. त्या दिवशी देशांतील दोन मोठ्या नेत्यांचा सन्मान केला जात होता. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांचे कोणतेही समर्थन करत नाही,” असा खुलासा केला आहे.

दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत असे विधान केले होते. ज्यामुळे देशभरातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *