बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सेंगरच्या पत्नीला भाजपने दिलं तिकीट

BJP gives ticket to Kuldeep Sanger's wife
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

उन्नाव: काही दिवसांपूर्वी उन्नाव बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश खवळून उठला होता. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन आमदार कुलदीप सिंग सेंगरला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षाही सुनावली आहे.
या बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या भाजप आमदाराच्या पत्नीवर आता भारतीय जनता पक्ष मेहरबान झाला आहे. भाजपने दोषी सेंगरच्या पत्नीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं तिकीट देऊ केलं आहे. कुलदीप सेंगरच्या पत्नी संगिता सेंगर या २०१६ साली अपक्ष लढून जिल्हा परिषद अध्यक्षा झाल्या होत्या.
उन्नावमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपने ५१ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आनंद अवस्थी यांना सरोसी (प्रथम) मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर भाजपने माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्या पत्नी संगिता सेंगर यांना तिकीट दिलं आहे. संगिता सेंगरवर विश्वास दाखवत पक्षांनं त्यांना फतेहपूर चौरासी तृतीय येथून तिकिट दिलं आहे.
याव्यतिरिक्त नवाबगंजचे माजी ब्लॉक प्रमुख अरुण सिंग यांना असोहा द्वितीय मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर भाजपाने जमिनीवर काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांवरदेखील विश्वास दाखवला आहे. या निवडणुकीत अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

कोण आहे कुलदीप सिंग सेंगर?
कुलदीपसिंग सेंगर उन्नावच्या वेगवेगळ्या मतदारसंघातून ४ वेळा निवडून गेलेले आमदार आहेत. २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण आमदार सेंगर यांना बहुचर्चित उन्नाव बलात्कार प्रकरणात २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर भाजपनं ऑगस्ट २०१९ मध्ये कुलदीपसिंग सेंगर यांना पक्षातून काढून टाकलं. कुलदीपसिंग सेंगरला कोर्टानं दोषी ठरवलं असून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *