राजे, जेजुरीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत योग्य निर्णय घ्या…
पुणे: जेजूरी गडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण १३ फ्रेब्रुवारीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. परंतु, तत्पूर्वीच या पुतळ्याचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर व युवकांनी आज पहाटे केले. या पार्श्वभूमीवर होळकर घराण्याचे युवराज भूषणसिंहराजे होळकर यांनी छत्रपती संभाजीराजे यांना पत्र लिहिले असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा पत्राद्वारे व्यक्त केली.
होळकर घराण्याचा समृद्ध सामाजिक कार्याचा उपयोग करून शरद पवार राजकीय स्वार्थ साधत आहेत. पवारांनी पेरलेल्या या घाणरेड्या राजकारणाची मुळं जर महाराष्ट्रात रूजत असतील तर याचे दिर्घकालीन परिणाम सर्वांनाच भोगावी लागणार आहेत. विदेशी मुळ असणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्रात जेजूरी गडावर पुतळा अनावरणाचे आमंत्रण देऊन समाजात चुकीचा संदेश देण्याचं व बहुजन समाजात फुट पाडण्याचं काम पवार यांच्याकडून होत असल्याचा आरोप या पत्राद्वारे भूषणसिंहराजे होळकर यांनी केला. महान परंपरेचे वारस व प्रतिनिधी असल्याने तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामाचा समाजावर दिर्घकालीन परिणाम होतो. त्यामुळे तुमची प्रत्येक कृती ही गांभीर्यपूर्वक घेण्यात येते. जेजूरी गडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण उद्या १३ फ्रेब्रुवारीला शरद पवार यांच्या हस्ते आणि आपल्या अध्यक्षेतेखाली होणार होते, परंतु तत्पूर्वीच या पुतळ्याच्या अनावरण आज पहाटे करण्यात आले आहे. यावरून या कार्यक्रमासंबंधी बहुजन समाजात किती अस्वस्थता आहे, याचा अंदाज तुम्हाला आला असेल. समाजाच्या भावनांचा विचार करून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे भूषणसिंहराजे होळकर यांनी पत्राद्वारे व्यक्त केली.