भरत जाधव यांची राज्य सरकारकडे कळकळीची विनंती!

मुंबई: आपल्या विनोदी व्यक्तिरेखांनी मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे अभिनेते भरत जाधव यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीला नव्याने ओळख मिळवून दिली. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये त्यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. एखाद्या साध्या सरळ भूमिकेलाही अत्यंत प्रभावीपणे सादर करण्याची जादू भरत जाधव यांच्याकडे आहे. नाटक असो किंवा सिनेमा त्यांच्यामुळे निर्मात्यांनी हाउसफुलचे बोर्डही पाहिले. मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार भरत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बरेच सक्रिय आहेत ते बरेचदा अनेक मुद्यांवर आपलं मत देखील व्यक्त करताना दिसून येतात. आता सरकारने नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेऊ नये अशी विनंती भरत जाधवांनी केली आहे.
गेल्या वर्षभरात नाटक सुरू करण्यासाठी आम्ही सर्वस्व दिलं. आज सर्व उपाययोजना करून नाटक सुरू आहे. नाट्यक्षेत्राला गती येत असताना असं संकट कोसळू नये. नाटक आज पूर्णपणे सावरलं नाही. अशात पुन्हा त्याचा घाव बसला तर त्याच्या होणाऱ्या भीषण परिणामांना तोंड द्यावं लागेलं. त्याचा थेट परिणाम आमच्या उपजिवीकेवर होतो. आता राज्य सरकारने नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेऊ नये ही कळकळीची विनंती आहे, असं भरत जाधव म्हणाले.
कोरोनामुळे देशातील सर्व क्षेत्राला मोठा फटका बसला होता. सिनेक्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनचा फटका बसला. जानेवारी उजाडला तरी राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह उघडली नव्हती. त्यानंतर अभिनेत्यांनी विविध माध्यमातून मागणी केल्यानंतर सरकारने ५० टक्के क्षमतेने सिनेमागृहे चालू केली होती. पण आता पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा नाट्यगृह आणि सिनेमागृह बंद करण्यात येईल अशी चिंता कलाकारांना सतावत आहे. त्यामुळे मराठी सिनेअभिनेता भरत जाधव यांनी लॉकडाऊन न करण्याची विनंती केली आहे. लॉकडाऊन लागलं तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू, असं त्यांनी म्हटलं आहे.
कलाकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लॉकडाऊन करू नका अशी विनंती आधी देखील केली होती. परंतू कोरोना प्रसार वाढत असेल तर लॉकडाऊन करावाच लागेल. जर हा निर्णय घ्यावाच लागलाच तर नाट्यक्षेत्राला यातून वगळावं अशी विनंती आम्ही सर्व कलाकार जाऊन मुख्यमंत्र्यांना करणार आहोत, अशी माहिती भरत जाधव यांनी दिली आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात सर्वात जास्त फटका उद्योग क्षेत्राला बसला. तर सिनेक्षेत्रातील कलाकार वेबसिरीजकडे वळालेली दिसली. सिनेक्षेत्रावर इतर क्षेत्रातील लोकांचा उदरनिर्वाह देखील अवलंबून असतो. यावर सरकार काय निर्णय घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.